अकलापूर देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार- आमदार अमोल खताळ

गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्त महाराजांचे दर्शन; देवस्थान विकास, पर्यटन आणि बैलगाडा घाटासाठीही दिली ग्वाही

संगमनेर | प्रतिनिधी
अकलापूर येथील जागृत श्री दत्त महाराज देवस्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. तसेच देवस्थानाला लवकरात लवकर ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असा ठाम विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.

गुरुपौर्णिमेनिमित्त आमदार खताळ यांनी अकलापूर येथील जागृत श्री दत्त महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी, शैलेश फटांगरे, जनार्दन कोकाटे, जयदास गायकवाड, संतोष गायकर, शिवाजी तळेकर, अमित शेळके, नामदेव गायकवाड, लहू आभाळे, सचिन आभाळे, अमोल कापसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, आमदार होण्यापूर्वी हिवरगाव पावसा येथील देवगड खंडोबा देवस्थानाला ‘क’ वर्गाचा दर्जा मिळाला होता. मात्र आमदार झाल्यानंतर शासन स्तरावर विशेष पाठपुरावा करून त्या देवस्थानाला ‘क’ वर्गातून ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून देता आला. त्याच धर्तीवर अकलापूर येथील श्री दत्त महाराज देवस्थानालाही ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती सर्व मदत व पाठपुरावा करण्यात येईल.

ते पुढे म्हणाले की, श्री दत्त महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर नेहमीच एक वेगळी ऊर्जा मिळते. त्या ऊर्जेच्या बळावर जनतेच्या सेवेसाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते. तसेच अकलापूर येथील बैलगाडा शर्यतीसाठी आवश्यक असलेल्या घाटाचे कामही लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

 

पर्यटन विकासालाही चालना देणार

अकलापूर परिसरातील रस्त्यांच्या विकासासाठी सुमारे २५ लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच अकलापूर श्री दत्त महाराज देवस्थानाचा पर्यटन स्थळांमध्ये समावेश व्हावा, यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. पर्यटन विभागाच्या माध्यमातून देवस्थानाचा विकास करण्याचा प्रयत्न राहील. स्थानिक नागरिकांनी आणि देवस्थान समितीने विकासासाठी सूचना कराव्यात. त्या सूचनांचा पुढील वर्षाच्या नियोजनात निश्चितच विचार करून अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!