नदीजोड’चे गाजर दाखवून निळवंडेचे पाणी पळवू नका

संगमनेर (प्रतिनिधी)

भोजापूर पूरचारीचा नुकताच नदीजोड प्रकल्पात समावेश केल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली आहे. या निर्णयाला भोजापूर पूरचारी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा कोणताही विरोध नाही. उलट, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे आम्ही स्वागत आणि समर्थनच करतो. मात्र, सरकारने यापूर्वी जाहीर केलेले अनेक महत्त्वाकां प्रकल्प अद्याप पूर्णत्वास गेलेले नाहीत. सुरत-अहमदाबाद महामार्ग, शक्तिपीठ महामार्गासह विविध प्रकल्पांची कामे रखडलेली आहेत. त्याचबरोबर हजारो कोटी रुपयांची कंत्राटदारांची देयके प्रलंबित असल्याचे चित्र आहे. फक्त घोषणाबाजी होते प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू होत नाही. संगमनेर तालुक्यातही खूप निधी आल्याच्या बातम्या येतात मात्र एकही काम सुरू होत नसल्याने  नदीजोड प्रकल्प प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार, याबाबत शेतकऱ्यांच्या मनात साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यातील प्रकल्पांचे गाजर दाखवून स्थानिक शेतकऱ्यांना निळवंडेच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवू नका, अशी भूमिका लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

याबाबत बोलताना बी आर चकोर म्हणाले की, भोजापूर पूरचारीचा नदीजोड प्रकल्पात समावेश करण्याच्या निर्णयाला आमचा विरोध नाही. मात्र, गेल्या ३० ते ४० वर्षांपासून अनेक पिढ्धांनी या प्रकल्पाची प्रतीक्षा केली. आता निळवंडे धरणाचे पाणी पाटातून वाहताना दिसत आहे. हे पाणी आपल्या ताटाजवळ आले असून, केवळ ते आपल्या शेतात पोहोचणे बाकी आहे. निळवंडे धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पाणीवाटा प्रथम मिळाला पाहिजे. निळवंडेचे पाणी पाटातून वाहत असताना स्थानिक पाईपलाईनचे काम रखडविणे योग्य नाही. भविष्यातील नदीजोड प्रकल्प पूर्ण होण्यासाठी किती वर्षे लागतील, याची निश्चितता नसताना सध्याचे उपलब्ध पाणी अन्यत्र वळविण्याचा प्रयत्न करू नये.

तर सचिन दिघे म्हणाले की नदीजोड प्रकल्प करा, पण स्थानिक शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याची किंमत मोजून नाही, अशी स्पष्ट भूमिका भोजापूर पूरचारी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी घेतली आहे.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी अनंत अडचणीवर मात करून निळवंडे धरण व डावा आणि उजवा कालवा पूर्ण केला त्यामुळे दुष्काळी भागात पाणी आले आहे. मात्र हे पाणी नदीजोड प्रकल्पाच्या नावाखाली पुढे नेले जात आहे किंबहुना निळवंडे च्या पाण्यावरून लक्ष विचलत करण्यासाठी असे गाजर दाखवले जात आहे.

विकास कामांना आमचा कोणताही अडथळा नाही मात्र संगमनेर तालुक्यात सुद्धा एकही काम होत नाही. असे असताना निळवंडे चे पाणी आम्हाला राहू द्या नदीजोड प्रकल्प कराच पण सध्या हक्काचे पाणी पळू नका असे आवाहन त्यांनी केले.

तर सुभाष सांगळे म्हणाले की संगमनेर तालुक्यामध्ये सध्याचे विद्यमान सत्ताधारी फक्त निधी आला इतका कोटी आला अशा बातम्या देतात प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू नाही जे काम सुरू आहे ते लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात मंजूर झालेली कामे आहेत याशिवाय आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून मिळालेले निधीतून काम होत आहे नवीन लोकप्रतिनिधीचे एक काम दाखवा असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!