सरपंचांच्या मुदतवाढीचा निर्णय आता ग्रामविकास विभागाच्या कोर्टात
सरपंच परिषद आक्रमक; अरविंद दळवी यांनी ग्रामविकास सचिवांची भेट घेत निवेदन दिले
मुंबई | प्रतिनिधी
ग्रामपंचायतींच्या सरपंचांना मुदतवाढ देण्याच्या मागणीवरून सरपंच परिषदेने आता शासनाकडे आक्रमक भूमिका घेतली आहे. सरपंच परिषदेचे अरविंद दळवी यांनी मुंबई येथे ग्रामविकास सचिव चंद्रकांत पुडलवारकर यांची भेट घेऊन सरपंचांच्या मुदतवाढीसंदर्भात निवेदन सादर केले.
सरपंचांच्या मुदतवाढीचा विषय ग्रामविकास विभागाकडे सोपविण्यात आला असून, याबाबत आज किंवा उद्या आदेश निघण्याची शक्यता असल्याचे सचिवांनी सांगितल्याची माहिती अरविंद दळवी यांनी दिली.
दरम्यान, सरपंच प्रशासक म्हणून कार्यरत असल्यास त्याबाबत अडचण नसल्याचे सचिवांनी स्पष्ट केल्याचे दळवी यांनी सांगितले. त्यामुळे आता शासन नेमका कोणता निर्णय घेते, याकडे राज्यातील सरपंचांचे लक्ष लागले आहे.
मुदतवाढीचा प्रश्न केवळ प्रशासकीय नसून ग्रामपंचायतींच्या कारभाराशी संबंधित असल्याने शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी सरपंच परिषदेकडून करण्यात आली आहे. निवेदनाद्वारे मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली असून, आता ग्रामविकास विभागाच्या अधिकृत आदेशाची प्रतीक्षा आहे.
शासनाच्या निर्णयानंतरच सरपंचांच्या मुदतवाढीबाबतची पुढील दिशा स्पष्ट होणार असल्याने आगामी २४ ते ४८ तास महत्त्वाचे ठरणार आहेत
