संगमनेर शहर 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नियंत्रणात – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

नगरपरिषदेकडून चांगल्या सुविधांबरोबर शहरात विकास कामे – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

आगामी पाच वर्षात सर्वांना अभिमान वाटेल असे काम करू – आ.सत्यजित तांबे

निधी कसा आणायचा हे आम्हाला चांगले माहिती – आ.सत्यजित तांबे

संगमनेर ( प्रतिनिधी ) निवडणुकीनंतर संगमनेर मध्ये कधीही राजकारण केले जात नाही. मात्र सध्या होणारे राजकारण हे पोरगळपणाचे आणि दुर्दैवी आहे. संगमनेर नगर परिषदेने मागील आठ महिन्यात चांगले काम केले असून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याबरोबर दर्जेदार विकास कामे हे वैशिष्ट्य ठेवले आहे. यापुढील काळात सुद्धा या सर्व कामांमध्ये नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा राहणारा असून शहरातील सुरक्षेसाठी अद्यावत 200 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने सुरक्षिततेसाठी मोठी मदत होणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले असून निधी कसा आणायचा हे आम्हाला चांगले माहित आहे. विरोधकांनी न आणलेल्या निधीचे व न केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये असे आवाहन आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे.

संगमनेर नगर परिषदेच्या वतीने संगमनेर शहरामध्ये 200 सीसीटीव्ही कॅमेरे व फूड कोर्ट चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी मा.आ.डॉ.सुधीर तांबे हे होते तर व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई मालपाणी, आमदार सत्यजित तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ.सौ.मैथिलीताई तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक, कैलास लोणारी,अरुण वाकचौरे, नगरसेवक सौ. अर्चना दिघे, सौरभ कासार, सौ.सीमा खटाटे, भारत बोऱ्हाडे, सौ.शोभा पवार, डॉ.अनुराधा सातपुते, सौ. प्राची कवडे, किशोर पवार,  गजेंद्र अभंग, सौ.वनिता गाडे, सौ.मालती डाके, नितीन अभंग, सौ.दिपाली पंचारिया, अमजद खान पठाण, विजया गुंजाळ, गणेश गुंजाळ, शकीला बेग,नूर मोहम्मद शेख, शहानवाज खान, सौ.सरोजना पगडाल, किशोर टोकसे, सौ.प्रियंका शाह, शैलेश कलंत्री, नंदा गरुडकर, मुजीब खान पठाण, स्वीकृत नगरसेवक जावेद खान पठाण, सोमेश्वर दिवटे, सौ.रचनाताई मालपाणी, मुख्याधिकारी डॉ.दयानंद गोरे, निखिल पापडेजा, धनंजय डाके, सुधाकर जोशी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, मा.आ.डॉ.सुधीर तांबे हे 92 मध्ये नगराध्यक्ष झाले आणि शहरात विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत अत्यंत सुंदर वाटचाल नगरपरिषदेने केली आहे. अनेक विषय आपण सोडवले आहे. निळवंडे धरण दोन्ही कालवे आणि धरणातून थेट पाईपलाईन आल्यामुळे शहरांमध्ये पाण्याची मुबलकता आहे. ग्रामीण भागामध्ये ही आता पाण्यामुळे शेतीमधून भाजीपाला व्यवसाय वाढत असल्याने त्याचा फायदा शहरातील बाजारपेठेला होणार आहे. शहरांमध्ये अनेक विकास कामे राबवली आहेत. हेच काम पुढे नेत मागील आठ महिन्यांमध्ये नगर परिषदेच्या नव्या टीमने चांगले काम केले आहे.

संगमनेर मध्ये निवडणुकीनंतर कधीही राजकारण होत नव्हते आणि ती आपली परंपरा नाही. मात्र सध्या पोरकटपणा सुरू झाला आहे. नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याबरोबर सांडपाणी व्यवस्थापन नगरपरिषदेला करावा लागणार आहे. याचबरोबर स्वच्छतेमध्ये आपले चांगले काम राहिले. या पुढील काळात नागरिकांच्या सहभागातून शहर अधिक स्वच्छ राहण्यासाठी नगरपरिषदेने काम करावे. चांगल्या रस्त्यांबरोबर भूमिगत लाईटचे जाळे निर्माण करा. चांगल्या कामांमध्ये अनेक अडथळे येतील. काम करत रहावे सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. मात्र पोलिसांनी या कार्यक्रमाला न येणे हे न उलगडणारे कोडे आहे. हे त्यांचे काम आहे असे सांगताना शहरातील नागरिकांनीही नगरपरिषदेच्या कामांना पाठिंबा राहील असेही ते म्हणाले.

आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी थेट पाईपलाईन योजना राबवली आणि शहरांमध्ये आज त्यामुळे मुबलक पाणी मिळत आहे. शहरात अद्यावत कॉलिटीचे 200 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून यासाठी जिल्हा नियोजन व पालकमंत्री यांचे आभार व्यक्त करत या निधीचे येथील विरोधकांनी श्रेय घेऊ नये. तुमची कोणतीही शिफारस या कामात नाही. नगरपालिकेसाठी मंजूर झालेला निधी येथील लोकप्रतिनिधीने पीडब्ल्यूडी कडे वळविला. शहरात विकास कामे होत आहे त्यामुळे अडथळा न घालता आम्ही एक मिनिटात न हरकत प्रमाणपत्र दिले. हा निधी तिकडे वळविण्यावर न बोललेले बरे असे सांगताना न आणलेल्या निधीचे आणि न केलेल्या कामाचे तुम्ही श्रेय घेऊ नका. निधी कसा आणायचा हे आम्हाला चांगले माहित आहे आम्ही निधी आणत राहणार. काम करत राहणार असा टोला नाव न घेता विरोधकांना त्यांनी लगावला.

सौ.दुर्गाताई तांबे यांच्यावर हक्क भंग दाखल करण्याचा हास्यास्पद प्रकार त्यांनी केला. लोकशाही, राज्यघटना मानणारे आमचा परिवार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्या करता जागेची मंजुरी आम्ही घेतली ज्यावेळेस तत्कालीन परिवहन मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली त्यावेळेस तुमची आणि त्यांची ओळख सुद्धा नव्हती. सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीतरी टीकाटिप्पणी करायची हा विरोधकांचा धंदा आहे. विकास कामांसाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या निधीबद्दल आम्ही जाहीर आभार व्यक्त करतो.

सध्या माहितीच्या अधिकाराच्या नावाखाली ब्लॅकमेल करण्याचा धंदा काही लोकांनी सुरू केला आहे. 200 सीसीटीव्ही कॅमेरे याचबरोबर 11 चौकांमध्ये माहिती देणारे स्पीकर बसवण्यात आले आहे. याचबरोबर दिवाळीला धुळमुक्त शहरासाठी धूळ मुक्त मशीन घेतल्या जाणार आहेत. आगामी पाच वर्षांमध्ये सर्वांना अभिमान वाटेल असे काम आपण करू असे आमदार सत्यजित तांबे म्हणाले.

तर श्रीमती सुवर्णाताई मालपाणी म्हणाल्या की, थोरात, तांबे परिवाराने तालुक्याच्या आणि शहराच्या विकासासाठी सातत्याने काम केले आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात हे आपल्या तालुक्याचे प्रमुख आहे तर आमदार सत्यजित तांबे यांची धडाडी आहे. महिलांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल नगर परिषदेने उचलल्याबद्दल त्यांनी यावेळी नागरिकांच्या वतीने नगरपरिषदेचे अभिनंदन केले.

तर मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, संगमनेर नगर परिषदेकडे शासकीय जागा कमी असून नव्याने फूड कोर्ट सुरू केले आहे. वाटचाल चांगली आहे. नागरिकांनी ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून स्वच्छतेसाठी अधिक पुढाकार घ्यावा असे सांगितले तर नगराध्यक्ष सौ.डॉ. मैथिलीताई तांबे म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेची टीम चांगले काम करत आहेत. महिला सुरक्षेसाठी रक्षक दल सुरू करण्यात आले आहे. याचबरोबर भटक्या कुत्र्यांची लसीकरण केले आहे. शहरांमध्ये ई-टॉयलेट व्यवस्था निर्माण केली आहे. 2.0 ही फक्त घोषणा नाही तर स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेर हरित संगमनेरसाठीची कटिबद्धता आहे. यामध्ये नागरिकांनीही सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी शहरातील विविध ठिकाणी मोठ्या आनंदात व जल्लोषमय वातावरणामध्ये उद्घाटन करण्यात आले. यावेळी शहरातील नागरिक, महिला व युवकांची मोठी उपस्थिती होती. आमदार सत्यजित तांबे व डॉ.मैथिलीताई तांबे यांनी स्कूटरवरून संपूर्ण शहरांमध्ये फेरी काढली. शहरात विविध ठिकाणी युवकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शहीद स्मारक उभारणार

संगमनेर हायटेक बस स्थानकासमोर परिवहन विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी जागा हस्तांतरित करण्यात आली असून या जागेवर आगामी काळामध्ये भव्य अश्वारूढ पुतळा उभा राहील. याचबरोबर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा व तिरंगा ध्वज आणि शहीद स्मारक नगर पालिकेच्या वतीने बांधण्यात येणार आहे. या कामासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपण सातत्याने पाठपुरावा केला असून जे आता श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे त्यांची त्यावेळेस ओळख सुद्धा नव्हती. आगामी काळात अद्यावत स्मारक बनवले जातील असे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या स्मारकांच्या प्रतिमांचे अनावरण करण्यात आले. या स्मारकांसाठी संग्राम पतसंस्थेच्या वतीने 5 लाख रुपयांची लोक वर्गणी देण्यात आली. तर किसनभाऊ हासे युवावार्ता परिवार यांनी 11 हजार रुपयांची लोकवर्गणी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!