प्रशासकांना मुदतवाढ द्या; गावांचा विकास थांबू देऊ नका
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बोराटवाडी गावात राज्यभरातील सरपंचांचे निवेदन
बोराटवाडी (प्रतिनिधी) : राज्यातील ग्रामपंचायतींच्या प्रशासकांना गावचा कारभार सुरळीतपणे चालविण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राज्यभरातील सरपंच व प्रशासकांच्या शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बोराटवाडी येथील गावी राज्यातील विविध भागांतून आलेल्या सरपंच व प्रशासकांनी एकत्र येत हे निवेदन दिले. सध्या राज्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक कार्यरत असून, त्यांच्याकडील मुदत संपुष्टात येत असल्याने गावांच्या दैनंदिन कारभारावर तसेच विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

एका विस्तार अधिकाऱ्याकडे आठ ते दहा ग्रामपंचायतींची जबाबदारी सोपविण्यात आल्यास प्रत्येक गावाला आवश्यक वेळ देणे आणि स्थानिक प्रश्नांवर तातडीने निर्णय घेणे प्रशासनासाठी अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे प्रशासकांना मुदतवाढ देऊन गावांचा कारभार त्यांच्यामार्फत सुरू ठेवावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
राज्यातील सध्याची आपत्कालीन परिस्थिती, दुष्काळसदृश स्थिती तसेच एसआयआरसह विविध प्रशासकीय प्रश्न लक्षात घेता तातडीने सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे शक्य नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. अशा परिस्थितीत गावांचा कारभार केवळ विस्तार अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चालविल्यास विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे सरपंचांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
या वेळी राज्यातील विविध विभागांतून आलेल्या सुमारे ५०० सरपंच व प्रशासकांनी निवेदन देत प्रशासकांना मुदतवाढ देण्याची मागणी केली.
या उपक्रमात शिवसेना शिंदे गटाचे राज्य प्रवक्ते जितेंद्र भोसले, राज्य उपाध्यक्ष अरुण दळवी, उरुळी कांचनचे सरपंच जगताप भाऊ, रुपक गावते यांच्यासह विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण व रत्नागिरी परिसरातील सरपंच, प्रशासक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावपातळीवरील प्रशासन सुरळीत राहावे, विकासकामांना गती मिळावी आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासकांना मुदतवाढ देण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
