बिबट्याची दहशत अन् वीजेचा लपंडाव; तळेगाव गटातील शेतकरी हवालदिल

आठ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करा; अन्यथा थोरात-तांबे यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलनाचा इशारा

तळेगाव | प्रतिनिधी :
तळेगाव गटातील परिसरात शेतीचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. एकीकडे रात्रीच्या वेळी बिबट्याची दहशत, तर दुसरीकडे महावितरणच्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.

दिवसा वारंवार वीज ट्रिप होणे, रात्री अचानक वीज ये-जा करणे तसेच वीजेचे झटके बसण्याच्या प्रकारामुळे शेतीपंप, मोटारी आणि विद्युत उपकरणे जळण्याची भीती निर्माण झाली आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना वेळेवर पाणी देणेही शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे.

रात्री शेतात जाणे जीवावर बेतण्याची भीती

शेतीसाठी रात्रीच्या वेळेत वीज उपलब्ध होणे आवश्यक असताना सायंकाळी ६ ते ९ या वेळेतच अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री उशिरा किंवा अपरात्री शेतात जाऊन पिकांना पाणी द्यावे लागते. मात्र परिसरात बिबट्याचा वावर असल्याने अंधारात शेतात जाणे धोकादायक ठरत आहे.

“एकीकडे बिबट्याची दहशत आणि दुसरीकडे वीजेचा लपंडाव; शेती वाचवायची की जीव?” असा संतप्त सवाल माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्रशेठ गोडगे पाटील यांनी उपस्थित केला.

वीजेच्या लपंडावामुळे शेतीचे नियोजन कोलमडले

वारंवार ट्रिपिंग आणि अचानक वीज येणे-जाणे यामुळे शेतीपंप व मोटारींचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. वीजपुरवठ्याचे कोणतेही निश्चित वेळापत्रक राहत नसल्याने शेतकऱ्यांचे पाणी नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. याचा थेट परिणाम उभ्या पिकांवर होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

महावितरणने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन वडझरी परिसरातील वीजपुरवठ्याची तांत्रिक तपासणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी महेंद्रशेठ गोडगे पाटील यांनी केली आहे.

आठ दिवसांची मुदत; अन्यथा जनआंदोलन

तळेगाव गटातील शेतीचा वीजपुरवठा आठ दिवसांत सुरळीत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजितदादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महेंद्रशेठ गोडगे पाटील यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या जीविताची आणि पिकांच्या नुकसानीची गंभीर दखल घेऊन महावितरण प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!