बेकायदेशीर क्रेशरला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; प्रशासनाने कारवाईची मागणी
(प्रतिनिधी) : परिसरात सुरू करण्यात येत असलेल्या एका बेकायदेशीर दगड क्रेशर प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला असून या क्रेशरमुळे शेजारील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित क्रेशरसाठी शेतकऱ्यांची कोणतीही कायदेशीर परवानगी घेतलेली नसून ग्रामपंचायत स्तरावरही ग्रामसभेत कोणताही ठराव मंजूर झालेला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रस्तावित क्रेशरमधून उडणाऱ्या धुळीमुळे आसपासच्या शेती पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे उत्पादनात घट होऊन आर्थिक नुकसान होईल, अशी चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत. तसेच पर्यावरण व आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने स्थानिक नागरिकांमध्येही नाराजीचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित क्रेशर कायदेशीर परवानग्यांशिवाय सुरू करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी प्रशासनाने तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी माजी मंत्री बच्चू कडू तसेच शेतकरी नेते अजित नवले यांची भेट घेणार असून त्यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती देणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून संबंधित क्रेशर कायदेशीर नियमांचे पालन करीत आहे का याची पडताळणी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
