तळेगाव गटातील दगड खाणीत बेकायदेशीर जेलिटीन फायरिंग; मोठ्या दुर्घटनेची भीती
संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर तालुक्यातील तळेगाव गटामध्ये मोठ्या प्रमाणावर दगड खाणींचे उत्खनन सुरू असून काही खाणचालकांकडून बेकायदेशीररित्या जेलिटीनचा वापर करून फायरिंग केली जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही खाणींमध्ये आवश्यक परवानग्या व नियमांचे पालन करून स्फोटकांचा वापर केला जात असला तरी अनेक ठिकाणी बेकायदेशीररीत्या जेलिटीनची वाहतूक व साठवणूक केली जात आहे. विशेष म्हणजे पिकअप व बोलेरो सारख्या खासगी वाहनांतून खुलेआम स्फोटकांची ने-आण केली जात असल्याचे समोर आले आहे. तसेच काही ठिकाणी लोकवस्तीच्या जवळील घरांमध्येच या स्फोटकांचा साठा ठेवला जात असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.

या गंभीर प्रकाराकडे संबंधित प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून, वेळेत योग्य ती कारवाई न झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता सामाजिक कार्यकर्ते शशिकांत जगताप त्यांनी व्यक्त केली आहे.

परिसरातील नागरिकांनी प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन बेकायदेशीर स्फोटक वापर व साठवणुकीवर कठोर कारवाई करावी, तसेच संबंधित खाणचालकांवर गुन्हे दाखल करून नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी मागणी केली आहे.
