अॅसिड हल्ला करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करा
आमदार अमोल खताळ; जखमी विद्यार्थिनीची घेतली भेट
संगमनेर / प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेला अॅसिड हल्ला अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या.

आमदार खताळ यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घटनास्थळी भेट देत सविस्तर पाहणी केली व घटनेची माहिती घेतली. आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याला अटक करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे, सरपंच श्रीनाथ थोरात, ग्रामपंचायत सदस्य सुमित काशीद, गणेश काशीद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थिनीवर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार खताळ यांनी रुग्णालयात जाऊन पीडित मुलीची भेट घेतली व तिच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली. डॉक्टरांनी योग्य उपचार सुरू असून मुलीची प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांचीही भेट घेत त्यांना धीर दिला.

“सहावीत शिकणाऱ्या निष्पाप अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अॅसिड हल्ल्याची घटना ऐकून मन सुन्न झाले. ही अत्यंत अमानुष व निंदनीय घटना असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांना समाजात अजिबात स्थान नाही. आरोपीची कोणतीही गय केली जाणार नाही आणि त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे. सध्या पीडित मुलीवर योग्य उपचार सुरू असून तिच्या उपचारांसाठी आणि पुनर्वसनासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी मदत मिळावी यासाठी मी प्रयत्नशील आहे. तिच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढा देऊ.”
— अमोल खताळ (आमदार)
………………………………………..
