कसारे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात सपन्न
संगमनेर तालुक्यातील कसारे येथे साईबाबा मंदिर ट्रस्टच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विविध मान्यवरांनी आंबेडकरांच्या विचारांना उजाळा देत त्यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमात बोलताना माजी सरपंच भागवत गायकवाड यांनी आंबेडकरांनी मांडलेले आर्थिक दृष्टिकोन, चलनव्यवस्था आणि आर्थिक स्थैर्य याविषयीचे विचार आजच्या काळातही तितकेच सुसंगत असल्याचे प्रतिपादन केले. जागतिक पातळीवरील बदलत्या अर्थकारणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या तत्त्वज्ञानाचे महत्त्व अधिक अधोरेखित होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी बाळासाहेब नाईक, माजी उपसरपंच शामराव नाईक, ग्रामपंचायत सदस्य दिलीप कार्ले, पोलिस पाटील वाल्मिक गाढे, काँग्रेसचे युवा नेते संदिप कार्ले, भाजपचे युवा नेते रमेश कानकाटे, भाऊसाहेब शेळके, निलेश कानकाटे, एकनाथ बोऱ्हाडे, पत्रकार रामनाथ बोऱ्हाडे, रखमा देवकर, अभिषेक बोऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रसंगी पोलिस पाटील वाल्मिक गाढे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नाईक, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर बाळासाहेब नाईक, भागवत गायकवाड, दिलीप कार्ले, संदिप कार्ले, गोरख नाईक, एकनाथ बोऱ्हाडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी माजी उपसरपंच शामराव नाईक म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन असून त्यातील घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही अधिक सशक्त झाली आहे. ते केवळ संविधानाचे शिल्पकार नसून माणुसकीचेही शिल्पकार असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पोलिस पाटील वाल्मिक गाढे यांनी भूषविले, तर सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नाईक यांनी केले.
