शिर्डीत ‘सालबर्डी’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण मा खासदार डॉ सुजय विखे पाटील यांचे हस्ते संपन्न…’

                      अंधश्रद्धेविरोधी ठाम संदेश

शिर्डी (प्रतिनिधी) – साईबाबांच्या पावन भूमीत आज शिर्डीत ‘नेबूला फिल्म’ निर्मित सालबर्डी या मराठी चित्रपटाचे पोस्टर अनावरण माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. चित्रपटाच्या प्रदर्शनपूर्वी आयोजित या कार्यक्रमाला दिग्दर्शक, निर्माता तसेच चित्रपटातील सर्व कलाकार उपस्थित होते.

या वेळी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की, चित्रपटाचे निर्माता देवडे पाटील हे जिल्ह्याचे भूमिपुत्र असल्याने त्यांच्या आग्रहास्तव हा सोहळा शिर्डीत आयोजित करण्यात आला. सालबर्डी चित्रपटाची पार्श्वभूमी नेवासा तालुक्यातील चांदा येथे घडलेल्या बालहत्याकांडाशी संबंधित असून, समाजात वाढत चाललेल्या जादूटोणा आणि भोंदूगिरीविरोधात ठोस संदेश देणारा हा चित्रपट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

समाजात अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि जादूटोणा यांसारख्या प्रवृत्ती थांबवण्यासाठी जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. लोकांनी परमार्थावर आणि देवावर विश्वास ठेवावा, भोंदू बाबांच्या आहारी जाऊ नये,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मराठी चित्रपटसृष्टीला नेहमीच विखे पाटील परिवाराचा पाठिंबा राहिल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, शिर्डी परिसरात आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मराठी कलाकारांना प्राधान्य देण्यात आले आहे. चला हवा येऊ द्या आणि अजय-अतुल यांच्या कार्यक्रमांचे उदाहरण देत त्यांनी मराठी कलावंतांच्या सन्मानासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.

जिल्ह्यातील नागरिकांनी सालबर्डी हा चित्रपट आवर्जून पाहावा, मराठी चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन द्यावे आणि स्थानिक निर्मात्याला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी साईबाबांचे दर्शन घेऊन सालबर्डी चित्रपटाच्या टीमने पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतला. यावेळी शिर्डी ग्रामस्थ व विखे पाटील परिवाराच्या वतीने दिग्दर्शक, निर्माता आणि कलाकारांना शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!