वडगाव पान येथील गडगे महाराजांवर भोंदूगिरीचे आरोप; अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कारवाईची मागणी
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील ‘दत्तधाम सरकार’ आश्रमाचे प्रमुख गडगे महाराज यांच्यावर भोंदूगिरी व लोकांच्या आर्थिक व मानसिक शोषणाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणी त्वरित कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बुधवारी (दि. ८ एप्रिल २०२६) समितीच्या राज्य सचिव ॲड. रंजना पगार-गवांदे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांना लेखी निवेदन देण्यात आले. या निवेदनात गडगे महाराज हे कोणतीही वैद्यकीय पात्रता नसताना लोकांवर उपचार करत असून, अध्यात्माच्या नावाखाली भाविकांची दिशाभूल करून त्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

समितीच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणी २०२० पासून सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, गडगे महाराज यांनी सर्व आरोप फेटाळून लावत, आपल्या आश्रमात केवळ ध्यानसाधना, प्रार्थना तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार केले जात असल्याचा दावा केला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे
