ग्रामीण विकासाचे शिल्पकार इंजि. संजयकुमार गायकवाड यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उद्या लोणीत

आश्वी : प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यात मोलाची भूमिका बजावणारे उपअभियंता इंजि. संजयकुमार भीमराज गायकवाड हे ३६ वर्षे ३ महिन्यांच्या प्रदीर्घ व निष्कलंक सेवेनंतर सेवानिवृत्त होत असून, त्यांच्या सेवापूर्ती निमित्त भव्य गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.


हा सोहळा रविवार, दि. ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता लोणी (बु.) येथील सुरभी मंगल कार्यालयात पार पडणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील राहणार आहेत.


संगमनेर तालुक्यातील तिगांव येथील रहिवासी असलेले इंजि. गायकवाड यांनी आपल्या सेवाकाळात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच घरकुल, वैयक्तिक शौचालय, सिंचन विहिरी आदी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणला.
त्यांच्या कारकिर्दीत अस्तगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत, लोणी व कोल्हार येथील शैक्षणिक व व्यावसायिक प्रकल्प तसेच पंचायत समितीची भव्य प्रशासकीय इमारत यांसारखी अनेक उल्लेखनीय कामे साकारली गेली आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत २०११ साली त्यांना ‘आदर्श अभियंता’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.


शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय प्रगती करत मुंबई येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधून स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका, तसेच पुणे विद्यापीठातून बी.ई. आणि एम.ई. पदव्या संपादन केल्या आहेत.
सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक कार्याचा ध्यास कायम ठेवत एनजीओच्या माध्यमातून गरजूंसाठी काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.


या सोहळ्यास माजी खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील, आमदार अमोल खताळ, आमदार आशुतोष काळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!