तळेगाव निमोण परिसरात संशयास्पद हालचाली; नागरिकांत भीतीचे वातावरण
तळेगाव निमोण (प्रतिनिधी) : तळेगाव निमोण परिसरात अलीकडच्या काळात बाहेरील राज्यांतून येणाऱ्या काही व्यक्तींकडून घरांची ‘राजस्थानी स्टाईल’मध्ये सजावट किंवा रेखी करण्याच्या नावाखाली संशयास्पद हालचाली होत असल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही व्यक्ती दिवसा कामाच्या निमित्ताने परिसराची पाहणी करून रात्रीच्या वेळी चोरीच्या घटना घडवत असल्याची चर्चा आहे.
या प्रकारांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी याबाबत पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. कोणत्याही प्रकारची सखोल चौकशी किंवा पडताळणी न करता अनोळखी व्यक्तींना राहण्यास परवानगी दिली जात असल्याबाबतही स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भविष्यात मोठ्या गुन्हेगारी घटना टाळण्यासाठी बाहेरील राज्यांतून येणाऱ्या व्यक्तींची ओळखपत्रे (ID) व गुन्हेगारी पार्श्वभूमीची खातरजमा करूनच त्यांना परिसरात राहण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
