ड्राय डे’ला हरताळ; नादुर–शिगोटे लोणी मार्गावर खुलेआम मद्यविक्री, नागरिकांत संताप

संगमनेर (प्रतिनिधी) – १ मे महाराष्ट्र दिन निमित्त राज्यभर ‘ड्राय डे’ घोषित करण्यात आला असताना नादुर–शिगोटे लोणी रस्त्यावर काही हॉटेलांमध्ये खुलेआम मद्यविक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाच्या स्पष्ट आदेशाला धाब्यावर बसवत काही व्यावसायिकांकडून सर्रास मद्यविक्री केली जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, समोरून बार बंद असल्याचे दर्शवले जात असले तरी मागील बाजूने गुप्तपणे मद्यविक्री सुरू असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही हॉटेलांकडे मद्यविक्रीसाठी आवश्यक परवाना (परमिट लायसन्स) नसल्याची बाबही उघडकीस येत असल्याने हा प्रकार अधिक गंभीर ठरत आहे.


दरम्यान, ‘ड्राय डे’चे नियम उघडपणे धाब्यावर बसवणाऱ्या अशा हॉटेलांवर उत्पादन शुल्क विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. परिणामी, किमान संगमनेर पोलिसांनी तरी या प्रकाराची दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे.
शासनाच्या नियमांचे उघड उल्लंघन होत असताना संबंधित यंत्रणा मात्र मूकदर्शकाची भूमिका घेत असल्याचे चित्र दिसत आहे. आता तरी प्रशासन जागे होऊन दोषींवर कठोर कारवाई करणार का, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!