चाळीस वर्षांच्या सत्तेतही तालुक्याचा विकास नाही
महायुतीचे बाळासाहेब दिघे आणि राजेंद्र सोनवणे यांची थोरातांवर टीका
संगमनेर/ प्रतिनिधी
माजी आमदार बाळासाहेब थोरात यांना गेल्या चाळीस वर्षांच्या कार्यकाळात अनेक प्रश्न सोडविता आले नाहीत. मात्र आमदार अमोल खताळ यांनी अवघ्या दीड वर्षांच्या कालावधीत प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू केले आहेत. तालुक्यात विकास कामांना गती मिळत असताना ते काही जणांना पाहवत नसल्याने ये नैराश्यातून आमदार खताळ यांच्यावर टीका करत असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब दिघे आणि शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र सोनवणे यांनी केला.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, ऊस विकास परिषदेच्या माध्यमातून गावोगावी जाऊन राजकीय आखाडे मांडण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र जनतेने लोकशाही मार्गाने तुमचा पराभव केला आहे त्या पराभवाचे तुम्ही आत्मचिंतन करण्याऐवजी आमदार खताळ यांच्यावर टीका करण्याचे काम सुरू केले आहे. भोजापूर चारीच्या दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागाकडून ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून चारीच्या रुंदीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे.तुमच्या कार्यकाळामध्ये या भागात पाणी पोहोचविण्यासाठी कुठलेच ठोस प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे अनेक गावे पाण्यापासून वंचित राहिली. मात्र महायुती सरकारच्या माध्यमातून जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून दमणगंगा-गोदावरी-वैतरणा या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्यात पाणी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.
संगमनेरचे पाणी पळविल्याचा आरोप करणाऱ्यांनी २००५ साली समन्यायी पाणी वाटप कायद्याचे ओझे संगमनेर करांवर तुम्हीच लादले होते. गणेश विसर्जनासाठीही पाणी उपलब्ध होत नव्हते, अशी परिस्थिती होती. मात्र गेल्या दोन वर्षांत भर उन्हाळ्यात निळवंडे डावा व उजवा कालवा तसेच प्रवरा नदीत शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी पाणी सोडण्यात आले. बंधारे, पाझर तलाव भरले जात असून ज्या गावांचा सिंचन योजनांमध्ये समावेश नाही, त्या गावांनाही पाणी देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पूर्वी पाणीच उपलब्ध नसल्याने विजेच्या मागणीचा प्रश्न निर्माण होत नव्हता. मात्र आता शेतीसाठी पाणी उपलब्ध होत असल्याने वीज पुरवठा सक्षम करण्यासाठी धांदरफळ साकूर जवळे, कडलग, हिवरगाव पावसा या वीज उपकेंद्रांची क्षमता वाढविण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेअंतर्गत कऱ्हे-तळेगाव येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू असून शेतकऱ्यांना हक्काची वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
पूर्वी तुमच्या कार्यकाळात वीज रोहित्र बदलण्यासाठी तुमचे पी ए शेतकऱ्यांकडून वर्गणी गोळा करत होते. मात्र आमदार खताळ यांच्या कार्यकाळात कोणाकडूनही एक रुपया न घेता दुसऱ्याच दिवशी रोहित्र उपलब्ध करून देण्याचे काम होत आहे. भोजापूर चारीच्या कामात कोणत्या ठेकेदारांनी किती वेळा काम सुरू करून किती खोटी बिले काढली याची माहिती या पंचक्रोशीतील लोकांकडे असल्याचा गंभीर आरोप ही दिघे व सोनवणे यांनी केला.
तळेगावचा भाग तुम्ही ९० टक्के पाण्यापासून कायम वंचित ठेवला त्यामुळे ऊस लावायचा कोठे हा प्रश्न आम्हा तळेगावकरांसमोर पडला आहे त्यामुळे तुम्हाला तळेगावला ऊस परिषद घेऊन नेमके काय साधायचे आहे असा सवाल उपस्थित करत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पा यांनी भोजापुरचारी जलसंधारणकडे होती ती जलसंपदाकडे वर्ग केली आहे गेली ४० वर्षात तिगाव माथ्या पर्यंत आलेच नाही ते पाणी जल संपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ पाटील यांनी टेस्टिंगच्या माध्यमातून की होईना ती गाव माथ्यापर्यंत पाणी आणून दाखवले व थोड्या दिवसात भोजपुर चारीचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब दिघे यांनी सांगितले
वैफल्यातून आमदार अमोल खताळांवर टीका….
आमदार अमोल खताळ यांना जनतेने विकासासाठी निवडून दिले आहे. रोजगार,आरोग्य, शिक्षण, शेती आणि पाणी यांसारखे सर्वसामान्यांचे जीवनाशी निगडित प्रश्न सोडविण्या साठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यामुळे वैफल्यातून होणारी टीका थांबवून त्यांना विकासकामे करून घ्या, अन्यथा जनता योग्य वेळी उत्तर देईल, असा इशारा देत आमदार अमोल खताळ शांतपणे काम करत आहेत. ते काय काम करतात हे जनता पाहत आहे. त्यामुळे वैफल्या तून त्यांच्यावर होणारी टीका आता कुठेतरी थांबली पाहिजे,” असे परखड मत शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे यांनी व्यक्त केली
