“40 वर्षांच्या विकासकामांचीच जनतेकडून पावती; टीकाकारांनी आधी स्वतःचा हिशोब द्यावा”

संगमनेर | प्रतिनिधी

माजी महसूल मंत्री तथा ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या 40 वर्षांच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “बाळासाहेब थोरात यांनी 40 वर्षांत काय केले, असा प्रश्न विचारणाऱ्यांनी आधी स्वतःच्या राजकीय अस्तित्वाचा इतिहास तपासावा. दुसऱ्यांच्या जीवावर टाळीत कावळा सापडलेल्या लोकांना विकासाबाबत प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार नाही,” अशी टीका करण्यात आली.

युवक काॅग्रेसचे विकास पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर तालुक्यात उभ्या असलेल्या शैक्षणिक संस्था, सहकार क्षेत्रातील भक्कम जाळे, निळवंडे धरणाचे पाणी, रस्ते, पूल आणि विविध विकासकामे ही जनतेला दररोज दिसणारी वास्तवता आहे. ज्यांनी स्वतःच्या कारकिर्दीत एक वीटही रचली नाही, ते आज उभ्या इमारतींचा हिशोब मागत आहेत, यापेक्षा मोठा विनोद दुसरा असू शकत नाही.

थोरात यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षे रखडलेला निळवंडे धरण प्रकल्प पूर्णत्वाकडे गेला. डावा व उजवा कालवा कार्यान्वित झाल्याने हजारो शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाचे पाणी पोहोचले. अमृतवाहिनीच्या माध्यमातून अभियांत्रिकी, कृषी, फार्मसी, एमबीए आणि पॉलिटेक्निकसारख्या उच्च शिक्षण संस्थांची उभारणी करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गावाजवळ शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली.

तसेच सहकार क्षेत्र मजबूत करत साखर कारखाना, दूध संघ आणि विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यात आला. शैक्षणिक संस्था, उद्योग आणि सहकारी उपक्रमांमधून हजारो युवकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध झाला. गावोगावी रस्ते, पूल आणि अन्य पायाभूत सुविधांसाठी मोठा निधी आणून विकासकामांना गती देण्यात आली.

 

“चाळीस वर्षांत काय केलं, असा प्रश्न विचारणाऱ्यांनी एकदा संपूर्ण संगमनेर तालुका डोळे उघडे ठेवून फिरून पाहावा. विकास दिसत नसेल तर दोष कामांचा नाही, तर नजरेचा आहे. जनतेच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी चार दशकं झिजावं लागतं; केवळ आरोपांच्या आधारावर ते मिळत नाही,” असेही निवेदनात नमूद करण्यात आले.

पवार यांनी पुढे म्हटले की, राज्यात मंत्रीपदावर असतानाही बाळासाहेब थोरात यांनी मतदारसंघाशी असलेली नाळ कायम ठेवत स्थानिक प्रश्नांसाठी सातत्याने मंत्रालयात पाठपुरावा केला. चार दशकांपासून जनता त्यांना वारंवार निवडून देत आहे, हीच त्यांच्या विकासकामांची सर्वात मोठी पावती असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी युवक काँग्रेसचे विकास पवार म्हणाले की, “बाळासाहेब थोरात यांनी गेल्या चार दशकांत संगमनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. निळवंडे धरण, कालव्यांचे जाळे, अमृतवाहिनीसारख्या शैक्षणिक संस्था, सहकार क्षेत्राची उभारणी आणि रोजगारनिर्मिती ही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देणारी कामे आहेत. त्यामुळे 40 वर्षांत काय केले असा प्रश्न विचारणाऱ्यांनी प्रथम तालुक्यातील विकासकामांचा अभ्यास करावा. जनतेने वारंवार दिलेला कौल हीच त्यांच्या कार्याची खरी पावती आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!