संगमनेरात आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात जनजागृती; २ जुलैच्या मोर्चासाठी गावोगावी बैठका

संगमनेर, प्रतिनिधी : अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात २ जुलै रोजी संगमनेर येथे होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समितीने तालुकाभर जनजागृती अभियानाला वेग दिला आहे. समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते गावोगावी बैठका, कॉर्नर सभा आणि भेटीगाठी घेऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत.

गुरुवार, २ जुलै २०२६ रोजी प्रांत कार्यालयावर अनुसूचित जातीतील विविध समाजघटकांचा मोर्चा काढण्यात येणार असून, या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी अॅड. सोमनाथ गायकवाड यांनी राज्य शासनाने बदर समितीच्या माध्यमातून राबविलेल्या उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेवर टीका करत, यामुळे अनुसूचित जातींमध्ये मतभेद निर्माण होण्याची भीती व्यक्त केली. तर संगमनेर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. किरण रोहम यांनी संविधानविरोधी असल्याचा आरोप करत या निर्णयाविरोधात मोठ्या संख्येने नागरिकांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

आरक्षण उपवर्गीकरणाची संकल्पना, त्याचे परिणाम आणि त्याबाबतची भूमिका याविषयी आरपीआय युवक तालुकाध्यक्ष अमोल जगताप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते रामनाथ गायकवाड यांच्या सहभागातून विविध गावांमध्ये जनसंपर्क मोहीम राबविण्यात येत आहे.

वडगाव पान, तळेगाव गण तसेच कोकणगाव, निमगाव जाळी, लोहारे, कसारे, तळेगाव आदी गावांमध्ये बैठका घेऊन नागरिकांशी संवाद साधण्यात आला. अॅड. किरण रोहम, अॅड. सोमनाथ गायकवाड, अमोल जगताप आणि रामनाथ गायकवाड यांनी गावोगावी भेटी देत उपवर्गीकरणाविरोधातील भूमिका स्पष्ट केली आणि २ जुलैच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.

 

यावेळी बोलताना अॅड. किरण रोहम म्हणाले, “अनुसूचित जातींच्या आरक्षणाबाबत कोणताही निर्णय हा संविधानाच्या चौकटीत आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वांनुसारच झाला पाहिजे. समाजात संभ्रम व मतभेद निर्माण होणार नाहीत, याची काळजी शासनाने घेणे आवश्यक आहे. आपल्या संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन २ जुलै रोजी संगमनेर येथे होणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.”

यावेळी बोलताना अॅड. सोमनाथ गायकवाड म्हणाले, “अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण हा सामाजिक न्याय आणि संविधानाच्या मूलभूत तत्त्वांशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. समाजात फूट पाडणारे कोणतेही निर्णय स्वीकारले जाणार नाहीत. आपल्या हक्कांच्या संरक्षणासाठी सर्व समाजबांधवांनी एकजूट दाखवत २ जुलै रोजी संगमनेर येथे होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. लोकशाही मार्गाने आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवून संविधानिक अधिकारांचे रक्षण करणे ही आजची गरज आहे.”

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!