रोही व हरीनच्या उपद्रवाने मेहकर तालुक्यातील शेतकरी त्रस्त; संरक्षणासाठी वन विभागाकडे निवेदन

मेहकर, प्रतिनिधी : मेहकर तालुक्यात रोही (नीलगाय) व हरीन यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. रात्रीच्या वेळी कळपाने शेतात घुसून ही वन्य प्राणी सोयाबीन, मका, कापूस, तूर तसेच इतर पिकांची नासधूस करत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

तालुक्यात हजारोच्या संख्येने रोही व हरीन फिरत असून त्यांचा बंदोबस्त करण्याबाबत प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, तसेच शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण व्हावे, अशी मागणी करत सरपंच परिषदेचे अरुण दळवी यांनी तालुका वन अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

निवेदनात वन विभागाने तातडीने सर्वेक्षण करून वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळावी तसेच भविष्यात अशा प्रकारच्या नुकसानीला आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

या गंभीर समस्येकडे वन विभागाने तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे

यावेळी अरुण दळवी म्हणाले, “मेहकर तालुक्यात रोही व हरीन यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक एका रात्रीत उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. वन विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य भरपाई देऊन पिकांच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात. अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!