पंचायत समिती निवडणुकीत चिचोली गुरवचे सुपुत्र मेजर महेंद्र सोनवणे काँग्रेसकडून उमेदवारीच्या चर्चेत!
संगमनेर (प्रतिनिधी) —
आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळेगाव गणात काँग्रेसकडून मेजर महेंद्र सोनवणे यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरु आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या मेजर सोनवणे यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी तळेगाव दिघे, चिचोली गुरव, वडझरी, लोहारे, कसारे या गावांमधून होत आहे.

सेवेतून निवृत्त झाल्यानंतर मेजर सोनवणे यांनी समाजकारणात झोकून दिले असून, परिसरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे वॉटर फिल्टर बसविणे, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व क्रीडासाहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अशा अनेक उपक्रमांमुळे ते लोकांच्या मनात घर करून आहेत.

शिर्डी मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे निकटवर्ती व विश्वासू म्हणून ओळखले जाणारे मेजर सोनवणे यांनी त्यांच्या माध्यमातून तळेगाव परिसरातील विविध विकासकामांना गती दिली आहे.
स्थानिक जनतेचा विश्वास, सामाजिक कार्यातील सहभाग आणि काँग्रेस पक्षाशी असलेली निष्ठा लक्षात घेता, “मेजर महेंद्र सोनवणे यांना उमेदवारी द्यावी” अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

