संगमनेर पंचायत समिती–जिल्हा परिषद निवडणूक
पक्षनिष्ठा की व्यक्तीनिष्ठा…?
(गणेश दिघे, तळेगाव दिघे)
अहिल्यानगर जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा, विधानसभा आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये सुज्ञ मतदारांनी आपली भूमिका स्पष्ट करताना कधी व्यक्तीनिष्ठा तर कधी पक्षनिष्ठा जपत कौल दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, निष्ठेला सर्वोच्च स्थान देणारा मतदार राजा आज कुणावर विश्वास ठेवतो आणि उद्या कुणावर ठेवेल, हे सांगणे कठीण आहे.
लोकसभा निवडणुकीत सत्तेत असूनही अपेक्षित निकाल साधता आला नाही, तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत मात्र याउलट चित्र दिसून आले. चाळीस वर्षांची सत्ता असूनही काही ठिकाणी राजकीय समीकरणे जुळवता आली नाहीत. यामागे मतदारांची निष्ठा व्यक्तीकडे न झुकता पक्षाकडे वळल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर झालेल्या नगरपरिषद निवडणुकांमधील निकाल सर्वांनाच ठाऊक आहेत. काही निकाल धक्कादायक ठरले, तर काही निकालांनी राजकीय शक्तींची खरी ताकद अधोरेखित केली. हे सर्व राजकीय विश्लेषणाच्या पलीकडे जाणारे असले, तरी मतदारांच्या बदलत्या भूमिकेचे द्योतक नक्कीच आहे.
आता सर्वांचे लक्ष लागले आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांकडे. या निवडणुकांमध्ये पक्षनिष्ठा महत्त्वाची ठरणार की व्यक्तीनिष्ठा, हे येणारा काळच ठरवेल. मात्र एवढे निश्चित आहे की या निकालांमुळे अनेकांना आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.
खऱ्या अर्थाने काम करणारा, खारीचा वाटा उचलणारा निष्ठावान कार्यकर्ता आजही उपेक्षित राहतो, तर गुढग्याला बाशिंग बांधून तयार असलेले आडबंग व संधीसाधू कार्यकर्ते मात्र जवळ ठेवले जातात. अशा प्रवृत्तींचे परिणाम काय होतात, हे गेल्या तीनही निवडणुकांतून स्पष्टपणे दिसून आले.
शेवटी विकासाभिमुख राजकारण महत्त्वाचे की कार्यकर्ताभिमुख राजकारण, हे ठरवण्याचा अधिकार मतदार राजाचाच आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये हे चित्र अधिक स्पष्ट होईल, यात शंका नाही.
