“रस्त्यांच्या कामात खंडणी, लोकप्रतिनिधींची नावे आणि थेट गडकरींचा फोन… हा लोकप्रतिनिधी कोण, हे सगळ्यांनाच माहीत आहे!”
— पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा खळबळजनक आरोप
अहिल्यानगर | प्रतिनिधी
राज्यातील रस्त्यांच्या कामात खंडणीखोरी, राजकीय हस्तक्षेप आणि दबावाचे राजकारण उघडकीस आणणारे धक्कादायक विधान पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.
“रस्त्याच्या कामात खंडणी मागितली जाते, काही लोकप्रतिनिधींची नावे पुढे केली जातात, थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा फोन आल्याचे सांगितले जाते. हा लोकप्रतिनिधी नेमका कोण आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे,” असे सूचक आणि आक्रमक वक्तव्य विखे पाटील यांनी केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
एका कार्यक्रमादरम्यान बोलताना विखे पाटील यांनी नाव न घेता काही लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांमध्ये ठेकेदारांवर दबाव टाकून आर्थिक मागण्या केल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
“सरकारी कामे लोकहितासाठी असतात, पण काही जण ती स्वतःच्या खिशासाठी वापरू पाहतात. अशा प्रकारांना यापुढे अजिबात थारा दिला जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
विशेष म्हणजे, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे नाव वापरून दबाव टाकला जात असल्याचा उल्लेख केल्याने हे प्रकरण अधिकच संवेदनशील बनले आहे. या आरोपांमुळे संबंधित लोकप्रतिनिधी कोण, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
दरम्यान, विखे पाटील यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सूचना देत म्हटले की,
“कोणत्याही दबावाला बळी न पडता कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. खंडणीखोरी किंवा गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.”
पालकमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील रस्ते विकासाच्या कामांतील गैरप्रकारांवर पुन्हा एकदा प्रकाशझोत टाकला गेला असून, राजकीय पातळीवर याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
