मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक; राज्य शासनाचा मोठा निर्णय
मुंबई, दि. २३ (प्रतिनिधी)
राज्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींबाबत राज्य शासनाने महत्त्वपूर्ण व दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेतला आहे. जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत ज्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपणार आहे, त्या सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचे अधिकृत शासन पत्रक २३ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आले.
ग्रामपंचायतींची निवडणूक होऊन नव्याने लोकनियुक्त ग्रामपंचायत अस्तित्वात येईपर्यंत संबंधित ग्रामपंचायतींचा सर्व प्रशासकीय कारभार प्रशासकांकडूनच चालवला जाणार आहे. या प्रक्रियेत उच्च न्यायालयाचा अवमान होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत.
या संदर्भातील पत्र अवर सचिवांकडून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यात आले असून, त्यानुसार प्रशासक नेमण्याची कार्यवाही तातडीने सुरू केली जाणार आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे येत्या काळात ग्रामपंचायतींच्या कारभारावर प्रशासकीय नियंत्रण वाढणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत पुन्हा एकदा चर्चेला उधाण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
