*
राजकारणापलीकडचे दादा – माजी मंत्री बाळासाहेब थोरात



संगमनेर (प्रतिनिधी)–महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली 1991 पासून अजितदादा यांनी राज्यात काम सुरू केले. 91 पासून आत्तापर्यंत आम्ही सोबत काम करताना अनेक आठवणी त्यांच्या आहेत. रुबाबदार व्यक्तिमत्व, स्पष्ट बोलण्याची पद्धत, प्रश्न सोडवण्याची पद्धत आणि प्रशासनावर मोठी पकड असलेला कायम जनतेत राहणारा नेता अशी त्यांची ओळख आहे.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सहा वेळा त्यांनी उपमुख्यमंत्री पद भूषवले यावेळी अनेक वर्ष मंत्री म्हणून आम्ही सोबत होतो. प्रशासनावर पकड असलेले हे व्यक्तिमत्व. राजकारण विरहित सर्वांशी त्यांची मैत्री होती. ग्रामीण भागातील प्रश्नांची त्यांना मोठी जाण होती. त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये शेतकऱ्यांच्या व ग्रामीण भागातील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ते आग्रही असायचे. अर्थमंत्री म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले. याचबरोबर कोरोना संकट काळामध्ये महाराष्ट्रावर आणि जगावर संकट आले असताना आम्ही एक दिलाने काम केले. कार्यकर्त्यासाठी कायम पाठबळ देणारा नेता अशी त्यांची महाराष्ट्रभर ओळख राहिली.

संगमनेर मध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने नवीन 5500 मे टन 30 मेगा वॅट वीज निर्मितीचा नवीन कारखाना सुरू केला. हा पाहण्यासाठी एक दिवस कोणालाही न सांगता अजितदादा थेट कारखान्यावर आले. आणि या नवीन प्रकल्पाचे अगदी तोंड भरून कौतुक करून हा प्रकल्प बारामती सह सर्वत्र कसा राबवता येईल याबाबतच्या सूचना त्यांनी आपल्या यंत्रणेला दिल्या. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये कारखान्याच्या विविध मीटिंगसाठी आम्ही कायम सोबत असायचो.

राजकारण विरहित सर्वांशी त्यांनी मैत्री जपली. मनामध्ये कोणाबद्दलही द्वेष नव्हता. स्पष्ट बोलणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या अकस्मात निधनाची बातमी ही अविश्वासनीय आहे.

महाराष्ट्राचे उमदे नेतृत्व अशी ओळख असलेले दादा आज आपल्यात नाही ही कल्पना होत नाही. जन माणसात राहणारा नेता अचानकपणे जाणं हे अत्यंत दुर्देवी आहे. कारण असे नेतृत्व तयार होण्यासाठी अनेक वर्ष लागतात. अजित पवार यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात कधीही न भरून येणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

बाळासाहेब थोरात

माजी मंत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!