सावकाश” हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत नव्हताच… अवेळी हरपलेलं वेगवान नेतृत्व


“सावकाश” हा शब्द माझ्या डिक्शनरीत नाही, असं अजितदादा पवार अनेकदा ठामपणे म्हणायचे. वेळेचं काटेकोर पालन, निर्णयातील स्पष्टता आणि कामाचा अफाट वेग हीच त्यांच्या नेतृत्वाची ओळख होती. अशा वेगवान नेतृत्वाचं आज अचानक आपल्यातून जाणं, ही केवळ एका नेत्याची नाही तर महाराष्ट्राची मोठी हानी आहे.
२००७ साली मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर अजितदादांशी माझा संपर्क अधिक जवळचा झाला. माझा राजकारणातील प्रवास समजून घेणारे, वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि कायम प्रोत्साहन देणारे दादा माझ्यासाठी फक्त नेते नव्हते, तर ते एक मजबूत आधार होते.
२०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांच्या राजकारणात तणाव निर्माण झाला. त्या काळात रागाच्या भरात मी दादांना फोन केला. त्यांनी अत्यंत शांतपणे मला मुंबईला बोलावलं. भेटीत त्यांनी मला जे सांगितलं, ती माझ्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी शिकवण ठरली.


“राजकारण शेवटी राजकारणाच्या पद्धतीनेच करावं लागतं. राज्यपातळीवर धोरण ठरवलं गेलं, त्यात तुझं नुकसान झालं, यासाठी मी तुला सॉरी म्हणतो.”
कडक स्वभावाचे नेते असूनही वयाने लहान कार्यकर्त्याला ‘सॉरी’ म्हणण्याचा मोठेपणा अजितदादांकडे होता.
यानंतर अनेक निवडणुकांमध्ये, प्रशासकीय निर्णयांमध्ये आणि धोरणात्मक कामांमध्ये त्यांचं मार्गदर्शन मला मिळत राहिलं. अलीकडे राज्याच्या युवा धोरणासाठी नेमलेल्या समितीत त्यांनी माझी निवड केली. “सत्यजीतकडे चांगल्या कल्पना आहेत, त्याच्या पद्धतीने काम करा,” असं त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितलं. सार्वजनिक व्यासपीठांवर त्यांनी माझ्या कामाचं केलेलं कौतुक आजही मनात ठसठसत आहे.


दादांचा स्वभाव रोखठोक होता, पण मनातून ते अत्यंत हळवे होते. त्यांच्या रागामागेही कामाची तळमळ असायची. “दादांचा राग शांत झाला की काम नक्की होणार,” हा विश्वास राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या मनात होता. म्हणूनच त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं भविष्य अधिक उज्ज्वल असेल, अशी आशा होती.
पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाचं शंभर टक्के श्रेय अजितदादांनाच जातं. देशातील उत्तम शहरांमध्ये आज पिंपरी-चिंचवडचा समावेश होतो, त्यामागे त्यांची दूरदृष्टी, कडक शिस्त आणि बारकाईने काम पाहण्याची सवय आहे. ते केवळ राजकारणी नव्हते, तर उत्तम व्यवस्थापक आणि दूरदर्शी नेतृत्व होते.
एक नेता घडायला अनेक वर्षे लागतात. अशा नेत्याच्या जाण्याने केवळ कुटुंबाचं नाही, तर लाखो कार्यकर्त्यांचं, संपूर्ण व्यवस्थेचं आणि विकासाच्या दृष्टीचंही मोठं नुकसान होतं. अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आज तीव्रतेने जाणवत आहे.
— आमदार सत्यजित दादा तांबे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!