मालदाड येथे महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
संगमनेर | प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील मालदाड येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सरपंच गोरक्षनाथ बाबासाहेब नवले यांच्या उपस्थितीत महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी बोलताना सरपंच गोरक्षनाथ बाबासाहेब नवले म्हणाले की, “महात्मा गांधी यांनी दिलेले सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि सर्वधर्मसमभावाचे विचार आजच्या काळात अधिक मार्गदर्शक आहेत. गांधीजींचे विचार केवळ स्मरणात न ठेवता ते दैनंदिन जीवनात आचरणात आणणे गरजेचे आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकता, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी या गांधीवादी मूल्यांवरच आपण वाटचाल केली पाहिजे.”
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य व सदस्या, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गांधीजींच्या कार्याचा आणि राष्ट्रउभारणीत त्यांच्या योगदानाचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रम शांततामय वातावरणात संपन्न झाला.
