पत्रकाराकडून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली


संगमनेर | प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी समजताच मन अत्यंत दुःखाने भरून आले. महाराष्ट्राने एक प्रभावी, तत्पर आणि निर्णयक्षम नेतृत्व गमावले असून त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.
अजितदादांशी संबंधित काही आठवणी आजही मनात ताज्या आहेत. २८ मार्च १९९९ रोजी माझा विवाह झाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात यांनी “तुझ्या लग्नाला मोठा पाहुणा आणतो” असे सांगितले होते. संगमनेरमधील आजच्या यशोधन कार्यालयात माझा विवाह सोहळा पार पडत असताना, थोरात साहेबांसोबत अचानक अजितदादा पवार कार्यालयात दाखल झाले.
लग्न विधीची पूर्ण तयारीही झालेली नसताना, दादा तब्बल एक तास तेथे थांबले. त्यांच्या उपस्थितीने आमची धांदल उडाली, मात्र त्यांनी आम्हा दाम्पत्याला दिलेले आशीर्वाद आम्ही आमचे सौभाग्य मानतो.
याआधीही अजितदादा संगमनेरला युवक काँग्रेसच्या शाखा उद्घाटनासाठी आले होते. अत्यंत तरुण, देखणे आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेले दादा सर्वांशी आपुलकीने वागत. देवी गल्लीतील राहतेकर यांच्या घरी झालेल्या चहा-पाण्याच्या कार्यक्रमात अजितदादांच्या शेजारी बसण्याचा योग मला आला होता. त्या क्षणांची आठवण आजही मनाला चटका लावून जाते.


अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना शब्द अपुरे पडतात. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी आपल्या कार्यक्षमतेचा, धाडसी निर्णयांचा आणि जनतेशी असलेल्या थेट संवादाचा ठसा उमटवला. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
— गौतम गायकवाड, संगमनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!