शिर्डीत साकारतोय स्वराज्याचा प्रेरणास्थळ; १० कोटींची भव्य शिवसृष्टी लवकरच उभारणार


शिर्डी (प्रतिनिधी):
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या विचारांना शिर्डीत भव्य रूप देण्यासाठी १० कोटी रुपयांच्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून वर्क ऑर्डर प्राप्त झाली आहे. त्यामुळे लवकरच या ऐतिहासिक प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
छत्रपती शासन आणि युवा शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमात बोलताना त्यांनी शिर्डीमध्ये शिवसृष्टी उभारण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक-नगरसेविका, विविध पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने उपस्थित माता-भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, सालाबादप्रमाणे शिर्डी परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. युवा शिर्डी ग्रामस्थ आणि छत्रपती शासन या दोन्ही संघटनांच्या माध्यमातून युवकांना सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांद्वारे योग्य दिशा देण्याचे काम सुरू असून शिर्डीचे भविष्य हे युवकांच्या खांद्यावर असल्याचे त्यांनी नमूद केले. विविध उपक्रमांच्या माध्यमातून युवकांमध्ये संघटनात्मक व सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे कार्य या संघटनांकडून सातत्याने होत असल्याबद्दल त्यांनी अभिनंदन व आभार व्यक्त केले.

आज समोर बसलेल्या माता-भगिनींनी महाराष्ट्राची पारंपरिक वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाला दिलेली उपस्थिती अभिमानास्पद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना शोभेल असा विकास आपण शिर्डीत करणार आहोत. बसस्थानकासमोरील इरिगेशन विभागाची जागा पाहणी केली असून शिवसृष्टीचे काम तातडीने सुरू करण्यात येईल, असे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायती आणि नगरपरिषदांमध्ये आदर्श ठरेल अशी ही भव्य शिवसृष्टी उभारण्यात येणार असल्याचा विश्वास व्यक्त करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेवेळी सर्व धर्म व घटकांना सोबत घेतलेला समावेशक विचार आजही मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ विखे म्हणाले युवा शिर्डी ग्रामस्थ आणि छत्रपती शासन या दोन्ही संघटनांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असून युवकांना योग्य दिशा देण्याचे काम विविध सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेसह विविध उपक्रमांमधून शिर्डीतील युवकांमध्ये संघटनात्मक व सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे कार्य या दोन्ही संघटनांच्या माध्यमातून प्रभावीपणे होत आहे.

तसेच छत्रपती शासन यांच्या वतीने ‘साईंची भूमी – स्वच्छतेची हमी’ हा उपक्रम राबविण्यात येत असून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे साईनगरी स्वच्छ व सुंदर ठेवणे ही प्रत्येक शिर्डीकराची जबाबदारी आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा टाकणे अथवा घाण करणाऱ्या व्यक्तींचे छायाचित्र काढून छत्रपती शासन यांना सादर केल्यास ५०० रुपयांचे बक्षीस देण्याचा उपक्रम हाती घेतल्याबद्दल डॉ. सुजय विखे पाटील यांनी छत्रपती शासन यांचे आभार व्यक्त केले.

शिर्डीचे भविष्य युवकांच्या खांद्यावर आहे. या युवकांना योग्य दिशा देण्याचे काम युवा शिर्डी ग्रामस्थ आणि छत्रपती शासन करत असून त्यांच्या माध्यमातून शिर्डीची प्रगती निश्चितपणे वेगाने होईल, असे ते म्हणाले.

शेवटी ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत शिर्डीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!