लोकनियुक्त सरपंच दिपालीताई फरगडे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित
पी.आर.के. प्रतिष्ठानतर्फे संगमनेर येथे राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा संपन्न
संगमनेर (प्रतिनिधी): पी.आर.के. प्रतिष्ठान, संगमनेर (जि. अहमदनगर) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला राज्यस्तरीय गुणगौरव सोहळा – २०२६ रविवार दि. ८ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता के.बी. दादा देशमुख सभागृह, सह्याद्री महाविद्यालय, संगमनेर येथे उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
यावेळी लोकनियुक्त सरपंच दिपालीताई फरगडे यांना ग्रामीण विकास, पारदर्शक प्रशासन व गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल “आदर्श सरपंच पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या सन्मानामुळे त्यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेतली गेली असून ग्रामविकासासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक नेते हिरालाल पगडाल होते. प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे, ह.भ.प. विजय महाराज भोईरकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अजय फटांगरे, असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष जयराम ढेरंगे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत घुले, आदिवासी नेते सखाराम गांगड, अभिनेते व शिव व्याख्याते डॉ. सागर फापाळे, ह.भ.प. सुधाकर महाराज पाटील, पी.जे. रोहम फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. किरण रोहम बाळासाहेब गायकवाड प्रतिष्ठान अध्यक्ष,पांडू तात्या लबडे ग्रामपंचायत सदस्य बेबी फरगढे,श्रीराम फरगडे,बाळासाहेब दिघे तंटामुक्ती अध्यक्ष, प्रदीप नरोडे सामाजिक कार्यकर्ते,अंताताई शेळके, सुभाष शेळके आरोग्य अधिकारी,प्रमोद फरकडे दूध डेरी चेअरमन भैरवनाथ नगर,सुजाता फरगडे संचालक खादी ग्रामोद्योग, वैशाली फरकडे चेअरमन शुभमंगल्ये महिला नागरी पतसंस्था,ऋतुवी नरोडे, अण्णासाहेब फरगडे, यश फरगडे,पार्थ आहेर,प्रवीण फरगडे,आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अध्यक्षीय मनोगतात हिरालाल पगडाल यांनी स्वातंत्र्यसैनिक पंढरीनाथ काकड यांच्या कार्याचा गौरव करत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेतल्याची आठवण करून दिली. त्यांनी पुतळा डोंगरावरील जंगल सत्याग्रहात सहभाग घेत सरकारविरोधात असहकार पुकारला होता. स्वातंत्र्यानंतर सलग वीस वर्षे सरपंच म्हणून कार्य करत त्यांनी ग्रामविकासासाठी मोलाचे योगदान दिले. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सहकार्याने डोळसणे येथे व्हालंत्री शाळा सुरू करून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, असे त्यांनी सांगितले.

अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांनी उपस्थित पुरस्कारार्थींना मार्गदर्शन करत समाजकार्य व शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास साधण्याचे आवाहन केले. संत साहित्याचे अभ्यासक ह.भ.प. सुधाकर महाराज पाटील यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांमधून समाजाला योग्य दिशा मिळू शकते, असे प्रतिपादन केले. विजय महाराज भोईरकर व सीताराम राऊत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी प्रविण फरगडे यांनी मनोगत व्यक्त करताना दिपालीताई फरगडे यांना मिळालेला हा सन्मान संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. ग्रामविकास, लोकसहभाग आणि पारदर्शक प्रशासनाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे आयोजन पी.आर.के. प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

