लोकवस्तीशेजारी कुक्कुटपालनामुळे आरोग्य धोक्यात; नियमांचे उल्लंघन, प्रशासनाचे दुर्लक्ष


संगमनेर (प्रतिनिधी) : गावातील लोकवस्तीच्या अगदी जवळ सुरू असलेल्या कुक्कुटपालन व्यवसायामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून या प्रकरणात प्रशासनाकडून तातडीने कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. संबंधित व्यावसायिकांकडून शासनाच्या नियमांचे पालन न केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
गावातील काही ठिकाणी कुक्कुटपालन व्यवसाय लोकवस्तीच्या अत्यंत जवळ केला जात असून त्यामुळे दुर्गंधी, माश्या-कीटकांचा त्रास तसेच संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी स्वच्छतेचे कोणतेही निकष पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे.


नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही वेळा मरण पावलेल्या कोंबड्यांचे योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता त्या थेट रस्त्याच्या कडेला किंवा उघड्यावर फेकून दिल्या जातात. त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरत असून दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच कुत्री-इतर प्राणी या मृत कोंबड्या ओढत नेत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.


प्रशासनाच्या नियमांनुसार कुक्कुटपालन प्रकल्प उभारण्यासाठी ग्रामपंचायत परवानगी, आरोग्य विभागाची मान्यता, स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाची योग्य व्यवस्था असणे आवश्यक असते. तसेच लोकवस्तीपासून ठराविक अंतर ठेवणे आणि मृत पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
याबाबत ग्रामस्थांनी संबंधित विभागांकडे तक्रार करण्याची तयारी दर्शवली असून ग्रामपंचायत, पशुसंवर्धन विभाग व आरोग्य विभागाने संयुक्त पाहणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रश्न असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!