संघर्ष, जिद्द आणि मैत्रीचा प्रवास; पत्रकार गोरक्ष नेहे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

संगमनेर | प्रतिनिधी

ग्रामीण मातीतून उभा राहिलेला संघर्ष, प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द आणि पत्रकारितेतील निष्ठा यांच्या बळावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे पत्रकार गोरक्ष नेहे यांचा आज वाढदिवस. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या गोरक्ष नेहे यांनी अथक परिश्रम, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीच्या जोरावर पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत संगमनेर तालुक्यात आदराचे स्थान मिळविले आहे.

 

संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील अत्यंत साध्या आणि आर्थिकदृष्ट्या हलाखीच्या परिस्थितीतील कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहान वयातच वडिलांचे छत्र हरपल्याने कुटुंबावर संकटांचे सावट आले. त्यातच दिव्यांगत्वाचे आव्हान समोर असतानाही त्यांनी कधीही हार मानली नाही. आईने मालपाणी उद्योग समूहात काम करत कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली, तर गोरक्ष यांनी तिच्या कष्टांची जाणीव ठेवत शिक्षणासोबत संघर्षाची वाट निवडली.

 

प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सावरगाव तळ येथे पूर्ण केल्यानंतर त्यांनी संगमनेर महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. पत्रकारितेची आवड जोपासत त्यांनी पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये पत्रकारितेचे विशेष शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी कमवा व शिका योजनेत सहभाग घेतला. तसेच हॉटेल, कापड दुकाने आणि हॉस्पिटलमध्ये विविध कामे करून शिक्षणाचा खर्च उचलला व कुटुंबालाही आर्थिक आधार दिला.

महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. वर्तमानपत्र वितरणापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे लोकमत युवा मंच प्रतिनिधी, तसेच विविध स्थानिक वृत्तपत्रांतील जबाबदाऱ्यांपर्यंत पोहोचला. गेल्या दोन दशकांमध्ये त्यांनी दैनिक आनंद, लोकपत्र, प्रभात, देशोन्नती, पुढारी यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांमध्ये काम करत पत्रकारितेचा समृद्ध अनुभव मिळवला.

सध्या ते नवराष्ट्र दैनिकाचे संगमनेर तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत असून इलेक्ट्रॉनिक व डिजिटल पत्रकारितेतही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एस-९ वृत्तवाहिनी शिर्डी तसेच नवराष्ट्र डिजिटलसाठीही ते तालुका प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे माध्यम आहे, या भावनेतून त्यांनी नेहमीच काम केले. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविणे, अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे आणि सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविणे ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये ठरली आहेत. त्यांच्या संयमी, मनमिळावू आणि प्रामाणिक स्वभावामुळे अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विशेष आदरभाव आहे.

वैयक्तिक आयुष्यात पत्नी शीतल नेहे यांची त्यांना भक्कम साथ लाभली आहे. जीवनातील प्रत्येक चढ-उतारात त्यांनी खांद्याला खांदा लावून साथ दिली. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असून दोघेही शिक्षण घेत आहेत.

गोरक्ष नेहे आणि आमदार अमोल खताळ यांच्यातील मैत्रीचे नातेही तालुक्यात चर्चेचा विषय राहिले आहे. सुमारे दोन दशकांपूर्वी जुळलेले हे स्नेहबंध आजही तितकेच दृढ आहेत. सामाजिक उपक्रम, जनआंदोलने आणि विविध सार्वजनिक कार्यात त्यांनी नेहमीच सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या कार्यनिष्ठेची दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी त्यांना जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) म्हणूनही संधी दिली असून ही जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडत आहेत.

संघर्षातून घडलेले व्यक्तिमत्त्व, पत्रकारितेतील निष्ठा, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि मैत्री जपण्याचा स्वभाव या गुणांमुळे गोरक्ष नेहे यांनी असंख्य लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भावी वाटचालीसाठी भरभरून यश लाभो, हीच सदिच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!