बेकायदेशीर खाणकामाविरोधात वडझरीतील शेतकऱ्यांचा आज आमरण उपोषण

ब्लास्टिंगमुळे घरांना तडे, विहिरी-बोअरवेल बाधित; प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात १ जूनपासून आंदोलन

संगमनेर, प्रतिनिधी :
संगमनेर तालुक्यातील वडझरी बु. परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी बेकायदेशीर खाणकाम व स्फोटकांच्या (ब्लास्टिंग) वापरामुळे होत असलेल्या गंभीर नुकसानीबाबत प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने १ जून २०२६ पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात सुरू असलेल्या खाणकामातील सततच्या ब्लास्टिंगमुळे अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले असून घरे कमकुवत झाली आहेत. तसेच गोठे, शेडचे खांब आणि इतर बांधकामांनाही नुकसान झाले आहे. या स्फोटांमुळे विहिरी व बोअरवेलमधील पाण्याचे स्रोत बाधित झाले असून काही ठिकाणी मोटारींसह पाणीपुरवठा व्यवस्था बंद पडली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

यासंदर्भात ग्रामस्थांनी दि. ७ मे २०२६ रोजी जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी तसेच ग्रामपंचायत व महसूल विभागाकडे लेखी तक्रार सादर केली होती. मात्र, अद्याप संबंधित खाणचालकांवर कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

सततच्या धुळीचे प्रदूषण, प्रचंड आवाज आणि ब्लास्टिंगमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून जीवितासही धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून अनधिकृत खाणकाम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, नुकसानग्रस्तांना न्याय द्यावा आणि पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास वडझरी बु. येथील साईबाबा मंदिरासमोर खाण परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ १ जून २०२६ पासून आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!