शेतकऱ्यांना मशागतीसाठी वीस लिटर पेट्रोल मिळणे कठीण; मात्र खान व क्रेशर मालकांना रोज हजारो लिटर डिझेल कसे? — शरद गोर्डे

📍संगमनेर

एकीकडे शेतकरी पेरणीपूर्व मशागतीसाठी पेट्रोल-डिझेल मिळवण्यासाठी पंपावर हेलपाटे मारत आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना केवळ वीस लिटर इंधनासाठीही चौकशी, कागदपत्रे व मर्यादा सहन कराव्या लागत आहेत. मात्र दुसरीकडे तालुक्यातील काही खाण व स्टोन क्रेशर व्यवसायांना दररोज दोन हजार लिटरपर्यंत डिझेल सहज उपलब्ध होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत ‘ज्ञानगंगा’चे संपादक शरद गोर्डे यांनी प्रश्न उपस्थित करत प्रशासनाने या इंधन पुरवठ्याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. “शेतकरी हा अन्नदाता असून त्यालाच इंधनासाठी अडवले जाते, पण खाण व क्रेशर व्यवसायासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात डिझेल कोणत्या निकषांवर मिळते?” असा सवाल त्यांनी केला.

तालुक्यात सुरू असलेल्या अनेक खाणी व क्रेशरवर नियमभंग, अवैध उत्खनन, प्रदूषण आणि ब्लास्टिंगचे आरोप होत असताना त्यांना मोठ्या प्रमाणात इंधन पुरवठा होणे हा चर्चेचा विषय बनला आहे. ग्रामस्थांच्या मते, या व्यवसायांमुळे शेती, पाणी स्रोत व पर्यावरण धोक्यात आले असून प्रशासन मात्र कारवाईकडे दुर्लक्ष करत आहे.

दरम्यान, संबंधित विभागांनी पेट्रोल पंपांमार्फत होणाऱ्या डिझेल पुरवठ्याची तपासणी करून खाण व क्रेशर व्यवसायांना होणाऱ्या इंधन वितरणाची माहिती जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!