मारलेली मिठी आणि आजोबा-नातवाच्या इतिहासाला उजाळा; तनपुरे यांच्या पक्षप्रवेशात रंगला दोन ‘दादां’चा आलिंगन सोहळा
मुंबई / प्रतिनिधी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याने राज्याच्या राजकारणात नवी समीकरणे निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
राहुरी, पाथर्डी आणि नगर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा रंगली. तनपुरे यांच्या भाजप प्रवेशामागे विखे यांचे राजकीय कौशल्य आणि मुत्सद्दीपणा असल्याचे चित्र कार्यक्रमातून स्पष्ट झाले.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्राजक्त तनपुरे यांचे पक्षात स्वागत करताना, “प्रश्नांची जाण असलेला अभ्यासू आणि युवा नेता भाजपमध्ये आल्याने पक्षाला निश्चितच बळ मिळेल,” असा विश्वास व्यक्त केला.

पक्षप्रवेशानंतर तनपुरे यांनी प्रथम रवींद्र चव्हाण यांचा, तर त्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यानंतर रंगला तो दोन ‘दादां’च्या आलिंगनाचा क्षण. विखे आणि तनपुरे यांनी एकमेकांना दिलेल्या मिठीने उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. याच वेळी “आजोबांनंतर आता नातूही एकत्र आले” या उल्लेखाने सभागृहात एकच हशा पिकला आणि जुन्या राजकीय इतिहासाच्या आठवणींना उजाळा मिळाला.
लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात भूमिका घेतलेल्या विखे आणि तनपुरे यांच्यातील हे नव्याने जुळलेले राजकीय समीकरण राहुरीच्या राजकारणात मोठे बदल घडवू शकते, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली. “तनपुरे-विखे युती राहुरीच्या विकासाला नवी दिशा देईल,” असा विश्वासही अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर डॉ. सुजय विखे यांनी प्राजक्त तनपुरे यांना मिठी मारताच वातावरण अधिकच उत्साहपूर्ण झाले. या संपूर्ण पक्षप्रवेश सोहळ्यानंतर तनपुरे यांचा भाजप प्रवेश घडवून आणण्यात विखे यांची निर्णायक भूमिका असल्याचे जवळपास स्पष्ट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
या पक्षप्रवेशामुळे राहुरीसह नगर जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या नव्या समीकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
