मोठ्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष; गरीब भाजीविक्रेत्यांवर कारवाईचा बडगा
नगरपालिकेच्या कारवाईवर युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख सौरभ देशमुख यांची टीका; पर्यायी जागा देण्याची मागणी
संगमनेर | प्रतिनिधी
संगमनेर नगरपालिकेने शहरातील मोठ्या अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याऐवजी हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब भाजीविक्रेते, फेरीवाले आणि छोट्या व्यावसायिकांवर कारवाई केल्याचा आरोप युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख सौरभ देशमुख यांनी केला आहे. या कारवाईमुळे अनेक कुटुंबांचा रोजगार हिरावला गेला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याची टीका त्यांनी केली.
देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अनेक ठिकाणी मोठ्या व्यावसायिकांनी सार्वजनिक जागांवर अतिक्रमणे केली आहेत. दिल्ली नाका, तीनबत्ती चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर तसेच पुणे-नाशिक महामार्गालगत अनेक ठिकाणी नियमबाह्य बांधकामे करून अतिक्रमणे करण्यात आल्याचे सर्वश्रुत आहे. मात्र, अशा मोठ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे धाडस न दाखविता नगरपालिका प्रशासनाने गोरगरीब भाजीविक्रेते, फेरीवाले आणि छोट्या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारल्याचा आरोप त्यांनी केला.
नगरपालिकेमुळे अनेक व्यावसायिक अडचणीत….
नगरपालिकेच्या या मोहिमेमुळे रोजंदारीवर व्यवसाय करणाऱ्या अनेक कुटुंबांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. दिवसाची कमाई करून संसार चालविणाऱ्या भाजीविक्रेत्यांचे स्टॉल, हातगाड्या आणि व्यवसाय हटविण्यात आल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कारवाई करताना प्रशासनाने मानवी दृष्टिकोन ठेवणे आवश्यक होते, असेही देशमुख यांनी नमूद केले. अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविताना प्रशासनाने सर्वांसाठी समान निकष लागू करावेत. मोठे असो वा छोटे, कायद्यापुढे सर्व समान असले पाहिजेत. केवळ गरीबांवर कारवाई करून मोठ्या अतिक्रमणधारकांना अभय देण्याचा प्रकार अन्यायकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पर्यायी जागा देऊन रोजगाराचे संरक्षण करा…
गोरगरीब विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देत त्यांच्या रोजगाराचे संरक्षण करावे, तसेच शहरातील सर्व प्रकारच्या अतिक्रमणांवर निष्पक्ष आणि समान कारवाई करावी, अशी मागणी सौरभ देशमुख यांनी केली आहे.
नगरपालिकेने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना सर्व भाजीविक्रेते, फेरीवाले आणि छोटे व्यवसाय करणाऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला
गरीबांवर अन्याय सहन करणार नाही”
गोरगरीब भाजीविक्रेते, फेरीवाले आणि छोटे व्यवसाय करणाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात युवा सेना संघर्ष करेल. विक्रेत्यांना पर्यायी जागा देऊन त्यांचा रोजगार सुरक्षित करावा आणि अतिक्रमण हटविताना सर्वांना समान न्याय द्यावा, अशी ठाम भूमिका युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख सौरभ देशमुख यांनी मांडली आहे.
…………………………..
