महिला सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य; नीलिमा कदम यांना ‘राजमाता जिजाऊ झुंजार महिला’ पुरस्कार

प्रतिनिधी | पुणे

महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मुक्ताई बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या अध्यक्षा नीलिमा लक्ष्मण कदम यांना मानस परिवार महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘राजमाता जिजाऊ झुंजार महिला’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

नीलिमा कदम या गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरण, स्वयंरोजगार मार्गदर्शन, कौशल्य विकास प्रशिक्षण, पर्यावरण संवर्धन, परसबाग प्रशिक्षण, बचत गट स्थापना, आरोग्य शिबिरे तसेच विविध प्रशिक्षणांसाठी प्रशिक्षक घडविण्याचे कार्य करत आहेत. विविध सामाजिक संस्था, शासकीय कार्यालये, महाविद्यालये, शाळा आणि संघटनांच्या सहकार्याने त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. तसेच नगरपालिका, ग्रामपंचायत आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठीही त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत.

हा पुरस्कार सोहळा ‘आदर्श कार्यकर्ता पुरस्कार प्रदान समारंभ २०२६’ अंतर्गत संस्थापक सुरेंद्रदादा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, खासदार नामदेव चव्हाण, माजी जिल्हा न्यायाधीश राजेंद्र केदार, अभिनेते व गायक दुष्यंत जगताप यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

याशिवाय, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मातृदिनानिमित्त आयोजित ‘भारत की बेटी पुरस्कार २०२६’ सोहळ्यातही नीलिमा कदम यांना प्रशिक्षण व कौशल्य विकास क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. मीडिया वर्ल्ड न्यूज आयोजित या कार्यक्रमास विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, जय मित्र पुणे सत्ताचे संपादक सुमित आंबेकर, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक मार्गदर्शक श्रीकृष्ण सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसेच, वारकरी साहित्य परिषद पुणे यांच्या वतीने आयोजित भव्य पुणे जिल्हास्तरीय महिला भजन स्पर्धेतही नीलिमा कदम यांचा विशेष सत्कार करण्यात आला. लोकक्रांतीचे संपादक सुरेश वाडकर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी ह.भ.प. भाऊसाहेब हांडे महाराज, आमदार चेतनदादा तुपे, स्थानिक लोकप्रतिनिधी, वारकरी संप्रदायाचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामाजिक, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे नीलिमा कदम यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!