सुनिल भारस्कर यांना ‘युवा उदयोजक’ पुरस्काराने सन्मान
संगमनेर (प्रतिनिधी) – बहुजन ग्रामीण विकास सेवा असोसिएशनच्या वतीने सामाजिक व राजकीय क्षेत्रात समाजसेवेच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्न सोडविण्याचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संगमनेर तालुक्यातील लोहारे- मिरपुर येथील सुनिल भारस्कर यांना प्रतिष्ठित ‘युवा उदयोजक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कसारे येथे आयोजित साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हा सन्मान सोहळा पार पडला. सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते सुनिल भारस्कर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी माजी महसुल मंञी बाळासाहेब थोरात बाभळेश्वर येथील गुरुकुलचे नवनाथ महाराज म्हस्के, नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक भागवत आरोटे, सरपंच सेवा महासंघाचे राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, सरपंच परिषदेचे अरुण दळवी, सरपंच सेवा संघाचे बाबासाहेब पावसे तसेच बहुजन ग्रामीण विकास सेवा असोसिएशनचे अध्यक्ष रामनाथ बोऱ्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार स्विकारताना सुनिल भारस्कर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी असून समाजसेवेची जबाबदारी अधिक वाढवणारा आहे. भविष्यातही सामाजिक बांधिलकी जपत युवकांच्या प्रगतीसाठी व ग्रामीण विकासासाठी सातत्याने कार्य करत राहणार आहे.”
या सन्मानाबद्दल सुनिल भारस्कर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

