आदर्श माता-पिता सन्मान सोहळा २०२६ उत्साहात संपन्न
लोहारे येथील अशोक कारभारी पोकळे यांना आदर्श माता पिता पुरस्काराने सन्मानित
संगमनेर (प्रतिनिधी) – बहुजन ग्रामविकास सेवा संघाच्या वतीने आयोजित “आदर्श माता-पिता सन्मान सोहळा २०२६” मोठ्या उत्साहात पार पडला. आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन त्यांना चांगले संस्कार घडवत नोकरी व व्यवसायाच्या क्षेत्रात सक्षम उभे करणाऱ्या प्रेरणादायी माता-पित्यांचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला.
परमपूज्य महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन या माता-पित्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या कर्तृत्ववान पालकांचा सन्मान केला.
यावेळी अशोक पोकळे यांचा मुलगा मनोगत व्यक्त करताना भावुक झाला. तो म्हणाला,
“आज आम्ही जे काही आहोत, ते आमच्या आई-वडिलांच्या अथक परिश्रमांमुळे आणि त्यागामुळेच आहे. त्यांनी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून आम्हाला शिक्षण दिलं, योग्य संस्कार दिले आणि आयुष्यात उभं राहण्याची ताकद दिली. हा सन्मान त्यांच्या कष्टांचा आणि त्यागाचा खरा गौरव आहे. आम्हाला त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली आहे.”

कार्यक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचला असून, पालकांच्या त्यागाची जाणीव करून देणारा हा उपक्रम ठरला. उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

