
संगमनेर (प्रतिनिधी):
तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळेगाव गटात महायुतीचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा ठाम विश्वास भाजपाचे कार्यकर्ते अमोल दिघे यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार असून, “पालकमंत्री देतील त्या उमेदवाराच्या विजयासाठी आम्ही कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करू,” असे ते म्हणाले. निमोण गट व तळेगाव गट हे तालुक्यातील महत्त्वाचे मतदारसंघ असून, या दोन्ही गटांकडे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे विशेष लक्ष राहणार असल्याची माहितीही दिघे यांनी दिली.
गत आठवड्यात तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षण सोडतीनंतर राजकीय समीकरणांमध्ये मोठी हालचाल सुरू झाली आहे. या सोडतीमुळे काही अनुभवी पदाधिकाऱ्यांचे गणित बिघडले असून, नव्या चेहऱ्यांसाठी राजकारणात प्रवेशाची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. विशेषतः तरुण आणि महिला कार्यकर्त्यांसाठी ही निवडणूक नव्या युगाची सुरुवात ठरू शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे.
तळेगाव गटात अनेक इच्छुक पुढाऱ्यांनी तयारी केली होती, परंतु आरक्षण बदलांमुळे काहींचा हिरमोड झाल्याचे चित्र दिसत आहे. तथापि, दिघे यांनी स्पष्ट केले की, “केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता असल्याने, अहिल्यानगर जिल्ह्यातही महायुतीचाच विजय निश्चित आहे.”

दरम्यान, गेल्या वर्षी संगमनेर विधानसभा मतदारसंघात झालेल्या राजकीय परिवर्तनानंतर तालुक्यातील सत्तासमीकरणे बदलू लागली आहेत. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या काही पारंपरिक विरोधकांनी त्यांच्याशी जवळीक साधली असली, तरी काहीजण थोरात गटातून बाहेर पडून पालकमंत्री विखे पाटील यांच्या गटात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
![]()
या निवडणुकीत नवीन तरुण चेहरे राजकारणात उतरतील, तर अनुभवी नेते संघटनबांधणी, कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण आणि रणनीतीवर भर देतील. दिवाळी उत्सवानंतर उमेदवारांच्या चर्चांना, बैठकांना आणि गाठीभेटींना वेग येईल, अशी चिन्हे दिसत आहेत.

