करूले गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र; प्रशासनाच्या निर्णयाविरोधात ग्रामस्थ संतप्त

संगमनेर (प्रतिनिधी) – उन्हाळ्याच्या तीव्र पार्श्वभूमीवर तळेगाव प्रादेशिक योजनेअंतर्गत येणाऱ्या मौजे करूले गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, कार्यकारी अभियंत्यांनी पाणीपुरवठा बंद केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. दोन वर्षांपासून योजना ठप्प असतानाही प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या मोटारी बंद करून विद्युत जोडणीही खंडित केली. त्यामुळे आधीच पाणीटंचाईने होरपळणाऱ्या ग्रामस्थांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. उन्हाळ्याच्या काळात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असताना प्रशासनाच्या या निर्णयामुळे गावकरी हैराण झाले आहेत.
दरम्यान, निळवंडे धरणातून कालव्यांना पाणी सोडले जात असताना इतर भागांमध्ये पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र करूले गावासारख्या लाभधारक क्षेत्रात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आल्याने शासनाच्या धोरणात विसंगती असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “आम्ही निळवंडे प्रकल्पाचे लाभधारक असताना आमच्यावर अन्याय केला जात आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

यासंदर्भात ग्रामस्थांनी जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार अमोल खताळ तसेच संबंधित प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देऊन पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की, “त्वरित पाणीपुरवठा सुरू न झाल्यास आंदोलन व मोर्चा काढण्याचा मार्ग स्वीकारावा लागेल.” भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
सध्या तरी करूले गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवून ग्रामस्थांना दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!