नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने करा

आमदार अमोल खताळ यांचे प्रशासनाला आदेश

संगमनेर / प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यात बुधवारी झालेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले. लोहारे येथे वीज पडून लताबाई कैलास सोनवणे (वय ४२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर डिग्रस येथे घराची भिंत अंगावर कोसळल्याने महादू माळी (वय ७०) या वृद्धाचा मृत्यू झाला आहे. या दुहेरी दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, दोन्ही घटनांची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधून संबंधित कुटुंबांना शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झालेल्या दोन्ही कुटुंबांना शासनाकडून प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून शेतीपिकांसह मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागातील पंचनामे तात्काळ करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याची माहितीही आमदार खताळ यांनी दिली.

संगमनेर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. लोहारे आणि डिग्रस येथील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून या कुटुंबांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. संबंधित कुटुंबांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. महायुतीचे सरकार शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण नेहमीच आवाज उठवत राहू.

— अमोल खताळ, आमदार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!