आमदार अमोल खताळांकडून सानप कुटुंबीयांचे सांत्वन

शासनाकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

संगमनेर / प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील तिगाव येथे दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि. २२) घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच आमदार अमोल खताळ यांनी शनिवारी (दि. २३) दुपारी तिगाव येथे जाऊन सानप कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

महेश गोरक्षनाथ सानप( वय- १८) आणि ओंकार गोरक्षनाथ सानप( वय- १४) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या भावांची नावे आहेत. यावेळी आमदार खताळ यांनी मृत मुलांच्या कुटुंबीयांना धीर देताना, “या दुःखद प्रसंगी आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत,” असे सांगितले. तसेच शासन स्तरावरून मिळणारी आर्थिक मदत, तसेच विविध योजनांमधून शक्य ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

घटनेच्या अनुषंगाने आमदार खताळ यांनी तहसीलदार धीरज मांजरे यांच्याशी चर्चा करून दुर्घटनेची सविस्तर माहिती घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच संबंधित प्रशासनाने तत्काळ पंचनामा व इतर आवश्यक कार्यवाही पूर्ण करून कुटुंबीयांना मदत मिळवून द्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. या प्रसंगी ग्रामस्थ, महायुतीचे पदाधिकारी, सानप परिवाराचे नातेवाईक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“दगड खाणी, बंधारे, तलाव, कालवे किंवा खोल पाण्याच्या ठिकाणी पाण्याची खोली, तळाचा अंदाज तसेच पाण्याचा प्रवाह याची पुरेशी माहिती मुलांना नसते. त्यामुळे अशा ठिकाणी अपघात होण्याची शक्यता अधिक असते. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत मुले पोहण्यासाठी अशा धोकादायक ठिकाणी जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे मुलांनी खोल पाण्याच्या ठिकाणी जाणे पूर्णपणे टाळावे. पालकांनीही आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवून त्यांना सुरक्षिततेबाबत सतत जागरूक करणे गरजेचे आहे. भविष्यात अशा दुःखद घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने जबाबदारीने वागणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

…………………………………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!