अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात 2 जुलैला संगमनेरमध्ये विराट महामोर्चा
संगमनेर (प्रतिनिधी) : अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात संगमनेर तालुक्यातील आंबेडकरी समाज एकवटला असून, 2 जुलै 2026 रोजी संगमनेर येथे विराट महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे आयोजन संगमनेर तालुका अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संयुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
समितीच्या वतीने तालुक्यातील सर्व आंबेडकरी बांधव, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटना, बौद्ध उपासक-उपासिका, माता-भगिनी, युवक-युवती आणि समाजातील सर्व घटकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण हा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सामाजिक एकतेच्या विचारांना धक्का देणारा हा निर्णय आहे. त्यामुळे हा लढा केवळ एका समाजघटकाचा नसून संपूर्ण अनुसूचित जाती समाजाच्या अस्तित्वाचा आणि संविधानिक हक्कांच्या संरक्षणाचा आहे.
महामोर्चा 2 जुलै रोजी सकाळी 11 वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून प्रांत कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना गावोगावी जाऊन जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक घरापर्यंत पोहोचून उपवर्गीकरणाचे परिणाम समजावून सांगावेत आणि अधिकाधिक नागरिकांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
“उपवर्गीकरण रद्द झालेच पाहिजे”, “संविधान बचाव” आणि “SC एकसंघ आहे, एकसंघ राहणार” या घोषणांसह हा महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती बंटी यादव यांनी दिली
