नोकरी फसवणूक प्रकरणातील तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवणार; आमदार सत्यजीत तांबे यांच्या मागणीवर गृहराज्यमंत्र्यांची ग्वाही
मुंबई, दि. २९ जून २०२६ : नोकरीच्या आमिषाने होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये तक्रार करणाऱ्या युवकांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, अशी महत्त्वपूर्ण ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत दिली. आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीदरम्यान या मुद्द्यावर सभागृहात चर्चा झाली
.
आमदार तांबे यांनी सांगितले की, बेरोजगारीमुळे अनेक तरुण कर्ज काढून पैसे देतात. फसवणूक झाल्यानंतर आरोपींकडून दबाव, धमक्या किंवा पैसे परत मिळाल्यानंतर भीतीपोटी अनेक जण तक्रारी मागे घेतात. त्यामुळे केवळ तक्रार मागे घेतली म्हणून प्रकरण संपुष्टात आले, असे मानता येणार नाही. अशा युवकांना सुरक्षित वातावरण मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच नोकरीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीसाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्याची तसेच राज्यभरातील अशा गुन्ह्यांची माहिती एकत्रित करून व्यापक तपास करण्याची मागणीही त्यांनी केली.
यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी राज्यातील सर्व संबंधित यंत्रणांकडून अशा प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती मागवून चौकशी केली जाईल. तसेच पोलिसांच्या विद्यमान हेल्पलाइनवर तक्रार नोंदविणाऱ्या युवकांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, जेणेकरून कोणत्याही तक्रारदारावर दबाव येणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही सभागृहात दिली.
