जिल्हा नियोजन समितीवर विठ्ठल घोरपडे यांची विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती
संगमनेर, प्रतिनिधी : अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेनेचे अभ्यासू व युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले विठ्ठल रावसाहेब घोरपडे यांची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या शिवसेना जिल्हा संघटक म्हणून कार्यरत असलेले विठ्ठल घोरपडे यांनी निळवंडे पाटपाणी लढ्यासह विविध जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने काम केले आहे.
मागील १५ वर्षांपासून दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून, तळेगाव-निमोण परिसरातील पाणीप्रश्न, सिंचन तसेच विविध विकासकामांसाठी ते सक्रिय राहिले आहेत. सामान्य शिवसैनिक म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास जिल्हा संघटक आणि आता जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदापर्यंत पोहोचला आहे.
अभ्यासू वृत्ती, दूरदृष्टी, नियोजन कौशल्य आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे विठ्ठल घोरपडे यांनी संगमनेर तालुक्यात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील विकास नियोजन प्रक्रियेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे

यावेळी नवनियुक्त विशेष निमंत्रित सदस्य विठ्ठल रावसाहेब घोरपडे म्हणाले, “जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी, विशेषतः ग्रामीण भागातील पाणी, सिंचन, रस्ते, शिक्षण आणि मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न प्रभावीपणे समितीसमोर मांडून त्यांचा पाठपुरावा करणार आहे. सामान्य नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत राहीन,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
