संगमनेरात १२ जुलैला राज्यस्तरीय बौद्ध वधू-वर परिचय संमेलन

संगमनेर | प्रतिनिधी

डी. एस. गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय बौद्ध वधू-वर परिचय संमेलनाचे आयोजन रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी संगमनेर-लोणी रोडवरील गणपती मंदिराजवळील वसंत लॉन्स येथे करण्यात आले आहे. विवाहयोग्य युवक-युवतींसाठी आयोजित या विनामूल्य सामाजिक उपक्रमाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा असल्याची माहिती पत्रकार गौतम गायकवाड यांनी दिली.

प्रतिष्ठानतर्फे सन २०११ पासून बौद्ध समाजासाठी सातत्याने वधू-वर परिचय संमेलनाचे आयोजन केले जात असून, या उपक्रमातून अनेक युवक-युवतींसह घटस्फोटित वधू-वरांचेही विवाह यशस्वीरीत्या जुळून आले आहेत. त्यामुळे समाजातील विविध स्तरांतून या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक होत आहे.

या उपक्रमाला राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, दिवंगत प्रेमानंद रूपवते, दिवंगत स्नेहलाताई रूपवते, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, नवी मुंबईचे माजी महापौर सुधाकरराव सोनवणे, प्रा. एस. झेड. देशमुख, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, लिज्जत पापडचे महाव्यवस्थापक सुरेशराव कोते, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, कैलास सोमाणी, डॉ. गौतमी सोनवणे आदी मान्यवरांनी भेट देऊन प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले आहे.

राज्यभरातील विवाहयोग्य युवक-युवती व त्यांच्या पालकांनी या संमेलनात सहभागी व्हावे, तसेच नोंदणी व अधिक माहितीसाठी यश टूर्स अँड ट्रॅव्हल्स, शासकीय विश्रामगृह, संगमनेर, जि. अहिल्यानगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन संयोजक के. एस. गायकवाड, ए. पी. बनसोडे, विनोद गायकवाड आणि डी. के. जमधडे यांनी केले आहे.

यावेळी पत्रकार गौतम गायकवाड म्हणाले की, “डी. एस. गायकवाड प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून बौद्ध समाजासाठी राज्यस्तरीय वधू-वर परिचय संमेलनाचे सातत्याने आयोजन करण्यात येत आहे. समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींना योग्य जीवनसाथी मिळावा, तसेच विवाह प्रक्रियेला सुलभ आणि विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. या संमेलनातून आजपर्यंत अनेक युवक-युवतींचे तसेच घटस्फोटित वधू-वरांचे संसार यशस्वीपणे जुळून आले आहेत. हा केवळ परिचय मेळावा नसून समाजाला एकत्र आणणारा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम आहे. राज्यभरातील विवाहयोग्य युवक-युवती आणि त्यांच्या पालकांनी या विनामूल्य संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!