तळेगाव ग्रामपंचायतीला संतप्त ग्रामस्थांचा टाळा; स्मशानभूमीतील चिखलामुळे अंत्यविधीदरम्यान संताप
तळेगाव दिघे | प्रतिनिधी
तळेगाव दिघे येथील स्मशानभूमीतील अत्यंत दयनीय अवस्थेच्या निषेधार्थ शनिवारी संतप्त ग्रामस्थ व युवकांनी तळेगाव ग्रामपंचायतीला टाळे ठोकून तीव्र आंदोलन केले. स्मशानभूमीत सर्वत्र चिखल व पाणी साचल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली.

आज स्वर्गीय ताराबाई तुळशीराम दिघे व हरिचंद्र जगताप यांच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत मोठ्या संख्येने नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते. मात्र, स्मशानभूमीत सर्वत्र चिखल आणि पाणी साचल्याने अनेकांना अंत्यविधी पार पाडताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही नागरिकांचा पाय घसरून ते खाली पडल्याच्याही घटना घडल्या. या प्रकारामुळे उपस्थितांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
या घटनेच्या निषेधार्थ तळेगाव व परिसरातील युवकांनी ग्रामपंचायतीच्या निष्काळजी व मनमानी कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेत ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले. स्मशानभूमीसारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात ग्रामपंचायतीला अपयश आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. स्मशानभूमीची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज विचार मंचाचे अध्यक्ष नंदकुमार दिघे, संपतराव दिघे, डॉ. नितीन दिघे, संदेश दिघे, सागर दिघे, किरण शिवाजी दिघे, निलेश दिघे, गणेश दिघे, मीननाथ दिघे, सुनील भाऊ दिघे, किरण दिघे, योगेश दिघे, प्रवीण भाऊ दिघे, प्रा. ऋषिकेश सोळशे, दीपक दिघे, भारत दिघे, चैतन्य दिघे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
