एसएमबीटी कडून मालदाड मच्छिंद्रनाथ गडावर 11500 वृक्षांचे रोपण

भावी 125 डॉक्टरांनी पर्यावरण संवर्धनासाठी दंडकारण्य अभियानात केले श्रमदान

एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टचे वृक्ष रोपण व संवर्धनात मोठे काम — मा.आ. डॉ सुधीर तांबे

संगमनेर (प्रतिनिधी)– सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानात नागरिक युवकांचा मोठा सहभाग राहिला आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हरितसृष्टीच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या या दंडकारण्य अभियानांतर्गत एसएनबीटी सेवाभावी ट्रस्टच्या वतीने मालदाड मच्छिंद्रनाथ गडावर 11 हजार पाचशे वृक्षांचे रोपण करण्यात आले असून त्याचे संवर्धन ग्रामस्थ करणार आहेत. ग्रामस्थ व एसएमबीटीच्या भावी डॉक्टरांनी श्रमदान करून पर्यावरण संवर्धनात मोठे काम केले असल्याचे प्रतिपादन दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.

मालदाड येथील मच्छिंद्रनाथ गडावर एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट व मालदाड ग्रामस्थ यांच्या वतीने 11500 वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी प्रकल्प प्रमुख सौ दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात, सरपंच गोरख नवले, समन्वयक प्रा दशरथ वर्पे, डेंटल कॉलेजचे प्राचार्य डॉ सतीश अब्राहम, प्रशासकीय अधिकारी डॉ. सुयोग तूपसाखरे, कार्यालयीन अधीक्षक रमेश दिघे, ग्रामपंचायत सदस्य सौ.भामाबाई नवले, सौ शालिनी नवले ,विलास नवले ,ज्ञानदेव नवले, संभाजी नवले, भाऊसाहेब नवले ,माधव नवले, यादव नवले यांच्यासह ग्रामस्थ महिला युवक व विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मालदाडच्या मच्छिंद्रनाथ गडावर एसएमबीटी सेवाभावी संस्थेच्या वतीने सीसीटी करण्यात आले आहे. डोंगराच्या सर्व बाजूंनी या समतालचरांमध्ये विविध देशी 11500 वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. मागील वर्षीही या ठिकाणी अनेक झाडांचे रोपण करण्यात आले होते. यामध्ये मालदड ग्रामस्थांचा व महिलांचा युवकांचा मोठा सहभाग राहिला आहे. अध्यात्म आणि पर्यावरण यांची सांगड घालून हा डोंगर अत्यंत सुंदर रीतीने हिरवा करण्यात आला आहे. डोंगराच्या सर्व बाजूने कडुलिंब, वड, पिंपळ, चिंच ,आवळा, हिरडा, करंज ,सीताफळ, करवंद,बांबू या झाडांचा समावेश आहे. एसएमबीटी सेवाभावी संस्थेच्या वतीने 125 भावी डॉक्टर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी ग्रामस्थान समवेत दिवसभर श्रमदान करून रिमझिम पावसात निसर्गाची व पावसाची गाणी पर्यावरणाच्या सेवेचा आनंद घेतला.

यावेळी बोलताना माजी आमदार डॉ सुधीर तांबे म्हणाले की, निरोगी शरीरासाठी जसे व्यायाम आहार महत्त्वाचा आहे तसे निरोगी सृष्टीसाठी पर्यावरण संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोना काळामध्ये ऑक्सिजन सर्वांना कळाला मात्र अनेक जण आता विसरून गेले. आपल्या सगळ्यांना ऑक्सिजन पुरवणारे वृक्ष आहेत आणि म्हणून प्रत्येकाने वृक्ष जपले पाहिजे. तरुण पिढीमध्ये निसर्गाप्रती मोठा जिव्हाळा निर्माण होत असून एसएमबीटी सेवाभावी संस्थेने विविध डोंगरांवर वृक्षारोपण व संवर्धनाचे केलेले काम कौतुकास्पद आहे. या अभियानात ग्रामस्थांबरोबर भावी डॉक्टरांचा सहभाग हा नक्कीच आनंद देणार आहे.

तर सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, नागरिकांच्या सहकार्यामुळे मच्छिंद्रगड हा येणाऱ्या काळामध्ये पर्यटना बरोबर अध्यात्माचे मोठे केंद्र ठरणार आहे. या डोंगराच्या परिसरात निर्माण झालेली हिरवाई ही सर्वांची आकर्षण राहणार आहे.

तर डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, भावी डॉक्टरांचे श्रमदानातून पर्यावरण संवर्धनासाठी केलेले काम हे इतर युवकांसाठी प्रेरणादायी आहे. माणसाच्या आरोग्याबरोबर आपल्या सर्वांना सृष्टीच्या आरोग्याची ही काळजी घेणे गरजेचे असल्याच्या त्या म्हणाल्या.

तर दशरथ वर्पे म्हणाले की दंडकारण्य अभियानाच्या माध्यमातून सप्तशृंगी गड येथेही 55000 हजार वृक्षांची रोपण करण्यात आले आहे त्याचप्रमाणे संगमनेर तालुक्यातील विविध डोंगरांवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्यात आले आहे.
तर सरपंच गोरख नवले म्हणाले की वनराई निर्माण करण्यामध्ये ग्रामस्थ व महिला व नागरिकांचे मोठे सहकार्य मला लाभले आहे .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दशरथ वर्पे यांनी केले तर सरपंच गोरख नवले यांनी आभार मानले यावेळी शिक्षक, ग्रामस्थ युवक व डॉ. विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!