आमदार अमोल खताळ यांचा पाठपुरावा ठरला निर्णायक
आठ वर्षांपासून बंद असलेली पशुधन विमा योजना पुन्हा सुरू; लाखो पशुपालकांना मोठा दिलासा
संगमनेर / प्रतिनिधी
सन २०१५ मध्ये सुरू करण्यात आलेली आणि २०१८ पासून बंद असलेली पशुधन विमा योजना पुन्हा सुरू करण्याच्या आमदार अमोल खताळ यांच्या मागणीला अखेर यश आले आहे. महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत राज्यात ‘पशुधन विमा योजना’ पुन्हा राबविण्यास मंजुरी दिली असून, या निर्णयामुळे राज्यातील लाखो पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अधिवेशनात प्रभावी मांडणी
मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार अमोल खताळ यांनी हा मुद्दा प्रभावीपणे उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले होते. पिकविमा योजनेप्रमाणेच पशुधनासाठीही विमा संरक्षण उपलब्ध असणे गरजेचे असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले होते. पशुपालन हा अनेक शेतकरी कुटुंबांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार असल्याने पशुधनाचे आर्थिक संरक्षण करण्यासाठी ही योजना तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी शासनाकडे केली होती.
आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर योजनेचे पुनरागमन
विशेष म्हणजे, जवळपास आठ वर्षांपासून ही योजना बंद होती. या कालावधीत अनेक पशुपालकांना जनावरांच्या मृत्यूमुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. मात्र या महत्त्वाच्या प्रश्नाकडे फारसे लक्ष वेधले गेले नव्हते. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले आमदार अमोल खताळ यांनी पशुपालकांच्या अडचणी आणि त्यांच्या समस्या लक्षात घेऊन हा विषय सातत्याने शासनाच्या निदर्शनास आणून दिला. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत शासनाने अखेर ही योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
कोणत्या जनावरांना मिळणार विमा संरक्षण?
राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेत गाई, म्हशी, बैल, रेडे, शेळ्या आणि मेंढ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. हवामानातील बदल, नैसर्गिक आपत्ती, रोगराई, विषबाधा, सर्पदंश, दूषित पाण्यामुळे होणारे आजार, गंभीर अपघात तसेच विविध संसर्गजन्य आणि साथीच्या रोगांमुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास पशुपालकांना आर्थिक नुकसानभरपाई मिळणार आहे.
पशुपालकांना आर्थिक सुरक्षिततेचे कवच
या निर्णयामुळे पशुपालकांना आर्थिक सुरक्षिततेचे कवच मिळणार असून, जनावरांच्या मृत्यूनंतर होणारा मोठा आर्थिक फटका कमी होण्यास मदत होणार आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ
पशुधनाचे संरक्षण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. दरम्यान, पशुधन विमा योजना पुन्हा सुरू झाल्याबद्दल पशुपालकांनी समाधान व्यक्त करत आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी व पशुपालकांना मोठा आधार मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
