शिर्डीच्या साई निर्माण ग्रुपच्या ‘बारा ज्योतिर्लिंग’ यात्रेची संकल्प पुर्ती
प्रतिनिधी । सरपंच माझा
शिर्डी: साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजयराव कोते आणि उपाध्यक्ष पंकज लोढा यांच्या संकल्पनेतून गेली १२ वर्षे सुरू असलेल्या बारा ज्योतिर्लिंग यात्रेची यंदा भव्य स्वरूपात सांगता होत आहे. साईसच्चरित्र पारायण करणाऱ्या हजारो साईभक्तांसाठी यंदा २९ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत पशुपतिनाथ (नेपाळ), काशी विश्वनाथ आणि प्रभू श्रीरामांची जन्मभूमी अयोध्या या पवित्र तीर्थक्षेत्रांची एक आगळीवेगळी आध्यात्मिक यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यंदाची ही यात्रा बारा ज्योतिर्लिंग यात्रेच्या १२ वर्षांच्या यशस्वी

प्रवासाची सांगता करणारी ठरणार असून, साईबाबांच्या पवित्र पालखीसह होणाऱ्या या अखेरच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी राज्यासह देशभरातील साईभक्तांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
या गेल्या १२ वर्षांत उपक्रमांतर्गत तब्बल २५ हजार साईभक्तांना भारतातील सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारनाथ, भीमाशंकर, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथ, नागेश्वर, रामेश्वर आणि घृष्णेश्वर या बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडविण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य असलेल्या भाविकांनाही तीर्थयात्रेचा लाभ
मिळावा, या उदात्त सामाजिक भावनेतून हा उपक्रम अखंडपणे सुरू ठेवण्यात आला. या यात्रेच्या माध्यमातून केवळ

तीर्थदर्शनच घडले नाही, तर साईबाबांच्या ‘सर्वधर्मसमभाव’ या विचारांचाही देशभरात प्रसार करण्यात आला आहे.
ही यात्रा साईनिर्माण ग्रुप, साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली जाते. या संपूर्ण उपक्रमाला साईनिर्माण ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विजय कोते, उपाध्यक्ष पंकज लोढा, शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, शिर्डी ग्रामस्थ, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खा. डॉ. सुजय विखे यांचे सातत्याने मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
